सांगलीत उद्या राष्ट्रवादीचा मेळावा

सांगली(Sangli) येथे शनिवार ता. १६ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी पक्षाचे सर्वेसर्वा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात अनेकजण राष्ट्रवादी
काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी माहिती पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 यावेळी इद्रिस नायकवडी, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, अजितराव घोरपडे, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, विलासराव जगताप, ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले, प्रदेश सरचिटणीस प्रतापनाना पाटील आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रा. जगदाळे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे महायुतीची सत्ता आल्यानंतर प्रथमच सांगलीत येत आहेत. दु. ४ वा. सांगली-मिरज रस्त्यावरील संजय भोकरे कॉलेजच्या प्रांगणात जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी सुमारे १० हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. आ. इद्रिस नायकवडी म्हणाले, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा हा मेळावा होणार आहे. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लक्षणीय प्रगती करेल, असा विश्वास आम. नायकवडी यांनी व्यक्त केला.