शहापूरमध्ये भावांनी केला मित्राचा खून

इचलकरंजी, पत्नीच्या नादी लागल्याच्या कारणावरुन पतीने आपल्या भावाच्या मदतीने मित्राचा दगडी वरवंट्याने ठेचून खून केला. शहापूर येथील गणेशनगरमध्ये शनिवारी रात्री साडे अकराच्या सुमारास सदरची घटना
घडली. विनोद आण्णासो घुगरे (वय३२, रा. गल्ली नं. ३, गणेशनगर, शहापूर)  असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघां संशयितांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी सौ. वनिता सचिन बोरगे (रा. गणेशनगर, गल्ली नंबर ३) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शहापूर पोलिसात संतोष दशरथ उर्फ वसंत पागे उर्फ नागणे (वय ३८) आणि संजय दशरथ पागे (वय ३६, दोघे रा. गणेशनगर, शहापूर) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, संशयित आरोपी संतोष पागे व संजय पागे हे गणेशनगर गल्ली नं. ३ शहापूरमध्ये रहातात.विनोद घुगरे हा देखील त्यांच्या शेजारीच रहात असून पागे बंधू आणि घुगरे हे एकमेकांचे मित्र होते. मयत विनोद घुगरे हा संतोष पागे यांच्या पत्नीच्या नादाला लागला होता. यावरुन त्यांच्यामध्ये वादावादी झाली होती. या वादातूनच शनिवारी, १६ ऑगस्ट रोजी रात्री पागे यांच्या घरात संतोष पागे आणि त्याचा भाऊ संजय पागे यांनी विनोद घुगरे याच्या कपाळावर दगडी वरवंटा मारला. या हल्ल्यात विनोद घुगरे हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच शहापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी मयत विनोद घुगरे याची बहिण सौ. वनिता सचिन बोरगे यांनी दिलेल्या फियादीवरून संतोष पागे आणि संजय पागे या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दोघांना ताब्यात घेतले असून अधिक तपास शहापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन सुर्यवंशी करीत आहेत.