मुंबईमध्ये (Mumbai) मागील दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने हाहाकार माजला आहे. ठप्प झालेली लोकल ट्रेनची वाहतूक, जागोजागी तुंबलेलं पाणी, रस्त्यांवरील वाहतूक कोंडी अशा अवस्थेतील मुंबई पाहून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. ‘सामना’च्या अग्रलेखातून ठाकरेंच्या शिवसेनेनं फडणवीसांवर प्रश्नांचा पाऊस पडाल्याचं पाहायला मिळत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेनं सरकारला एकूण सात प्रश्न विचारलेत.
“हवामान खात्याचा इशारा आला की, सरकार ‘रेड अलर्ट’चे पत्रक काढून मोकळे होते. ‘रेड अलर्ट’चा इशारा दिला आणि जनतेला सावध राहायला सांगितले म्हणजे सरकारची जबाबदारी संपते काय? पाऊस सुरू झाला की, लोक आपापल्यापरीने सावधगिरी बाळगतातच, पण यंदाच्या पावसाळ्यात मुंबई दुसऱ्यांदा बुडाली त्याला जबाबदार कोण?” असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं विचारला आहे.
“मुख्यमंत्री फडणवीस महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात येऊन लोकांनी सावधगिरी बाळगावी असा इशारा देऊन मोकळे झाले. जनतेला सावधानतेचा इशारा देणाऱ्या सरकारने मुंबई जलमय होणार नाही यासाठी कोणती सावधानता बाळगली? रस्ते बंद होणार नाहीत, मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल सेवा ठप्प होणार नाही यासाठी कोणती उपाययोजना केली? एकापाठोपाठ एक सर्व रस्ते जलमय होत असताना सरकार व महापालिकेचा आपत्कालीन कक्ष काय करीत होता?” असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं केला आहे.
“मेमध्ये पहिल्या पावसात मुंबई बुडाली तेव्हा त्याचे खापर कंत्राटदारावर फोडून सरकारने जबाबदारी ढकलली होती. मग आता पुन्हा बुडालेल्या मुंबईचे खापर फोडण्यासाठी सरकारने कोणाचे डोके शोधले आहे? मुंबई शहराला तीन-तीन पालकमंत्री आहेत व मुंबई जलमय होत असताना हे तिन्ही पालकमंत्री काय करीत होते? यातील एक सहपालकमंत्री कबुतराच्या वादात भलतेच सक्रिय झाले होते. मात्र पावसामुळे मुंबईकरांची दैना उडत असताना ते निष्क्रिय दिसले,” असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे.
“आपले व आपल्या मिंधे मंडळातील सहकारी मंत्र्यांचे घोटाळे लपवण्यासाठी ऊठसूट दिल्लीला पळणारे मुंबई शहराचे पालकमंत्री गेल्या दोन दिवसांत मुंबईकरांच्या मदतीला धावून आल्याचे कुठे दिसले नाही. आता मात्र त्यांचे फोटोसेशन व चमकोगिरी सुरू आहे,” असा टोला अग्रलेखातून लागवण्यात आला आहे.
