नांदेडमध्ये पूरस्थिती आणखी गंभीर; मृतांचा आकडा वाढला

नांदेड (Nanded) जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील हसनाळ गावात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली असून काल मंगळवारी तीन महिलांचे मृतदेह सापडले होते. आज आणखी एका व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने मृतांचा आकडा आता चारवर पोहोचला आहे. यामध्ये तीन महिलांसह एका पुरुषाचाही समावेश आहे.

मुखेड तालुक्यातील विविध भागातून एकूण 9 जण पूराच्या पाण्यात वाहून गेले होते. यातील 8 जणांचे मृतदेह सापडले असून एकाचा शोध अद्याप सुरू आहे. हसनाळ गावातून वाहून गेलेल्या पाचही जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. तर धडकनाळ येथे कार आणि ऑटो वाहून जाऊन 4 जण बेपत्ता झाले होते त्यापैकी 3 जणांचे मृतदेह मिळाले आहेत.

कालपासून चार गावांमधील 293 लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. रावणगाव येथून 225, हसनाळ येथून 8, भासवाडी येथून 20 नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. यासाठी इंडियन आर्मीचे पथक केप्टन विनय राणा यांच्या नेतृत्वाखाली 90 जवानांसह दाखल झाले आहे. पूर आणि अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यातील शेतीला मोठा फटका बसला आहे. 2,59,789 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. 3,24,234 शेतकरी बाधित झाले असून सोयाबीन, तुर, मुग, उडीद यांसारखी पिके वाहून गेली आहेत. शेतकरी आता तातडीच्या नुकसानभरपाईची मागणी करत आहेत.

लेंडी धरण परिसरातील बाधित गावांमध्ये पूराचे पाणी शिरल्याने 350 हून अधिक घरे कोसळली आहेत. रावणगाव, हसनाळ, भिंगोली आणि भासवाडी गावातील घरांचे या पावसामुळे सर्वाधिक नुकसान झाले आहे. अनेक कुटुंबे उघड्यावर आली आहेत. हसनाळ गावातील ग्रामस्थांनी प्रशासनाकडून मदत नाही असा आरोप केला आहे. ‘ग्रामस्थांना तीन दिवसांपासून अन्न मिळालेले नाही’ असा आरोप करत गावकरी मदतीसाठी ओरडत आहेत. अनेक घरे पडली असून नागरिक बेघर झाले आहेत.

आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी हसनाळसह पूरग्रस्त भागांची पाहणी करून मृतांच्या नातेवाईकांना भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, ‘पूरामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना सरकारकडून तात्काळ 5 लाख रुपये मदत दिली जाईल. तसेच सिंचन पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी केली जाईल. दोषी अधिकारी आढळल्यास कारवाई होईल. पशुधनाच्या मृत्यूबाबत NDRF निकषानुसार मदत देण्यात येईल. मुख्यमंत्री आणि शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.