२० वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ; गॅस सिलिंडरमध्ये कात्री खुपसून ….

छत्रपती संभाजीनगर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गॅस सिलिंडरमध्ये (Gas Cylinder) कात्री खुपसून त्याचा स्फोट करत वीस वर्षांच्या महाविद्यालयीन तरुणाने आत्महत्या केली आहे. जवाहरनगर परिसरातील न्यू शांतिनिकेतन कॉलनीमध्ये हा प्रकार घडला. ओम संजय राठोड असं या तरुणाचं नाव असून, तो CA परीक्षेची तयारी करत होता.

प्राथमिक माहितीनुसार, महाविद्यालयातून परत आल्यावर त्यानं घराचं दार बंद करून आधी पंख्याला साडी लावून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो प्रयत्न फसल्यानं त्यानं गॅस सिलिंडरमध्ये कात्री खुपसून त्याचा स्फोट केला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने वेळीच आग नियंत्रणात आणत तरुणाला घाटी रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केलं. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

उपलब्ध माहितीनुसार ओम राठोड हा बंबाट नगर येथे वास्तव्यास असून, अभ्यासात त्यानं सुरुवातीपासूनच चातुर्य दाखवलं होतं. इयत्ता दहावीच्या परीक्षेत त्याला 93 टक्के गुण होते. काही दिवसांपूर्वीच ओमची आई आणि बहीण त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी गेले होते. जेव्हा वडीलांसह ओम घरीच होता. महाविद्यालयापर्यंतचा प्रवास दूर असल्यानं तो जवाहर नगर भागात काकांकडे राहत असे.

बुधवारी तो वडिलांसोबत घरातून बागेर पडला आणि चार्जर विसरल्याचं सांगत तो काकाच्या घरी आला. काकूशी संवाद साधला पण कुठंही त्याच्या मनात घालमेल सुरू असल्याचं जाणवलं नसल्याचं तपासातून समोर आलं. काकू मुलाला आणण्यासाठी बाहेर गेली आणि परतल्यानंतर त्यांनी ओमला आवाज देण्याचा प्रयत्न केला.

काहीही उत्तर न आल्यानं त्यांनी शेजाऱ्यांना ही बाब सांगितली. तितक्यात पुढच्याच क्षणी स्फोटाचा मोठा आवाज झाला आणि घरात जाऊन पाहिलं असता ओम आगीच्या विळख्यात दिसला. तातडीनं शेजाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र, प्रचंड प्रमाणात शरीर होरपळल्यानं त्याचा मृत्यू ओढावला. ओमनं किचनमधील सिलेंडर रेग्युलेटरच्या जागी गॅस लीक होण्यासाठी त्यात कात्री खुपसली होती. दारंखिडक्या बंद ठेवल्या होत्या, अशी माहिती अग्निशामक विभागानं दिली.