मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवसास्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर राज ठाकरे आणि फडणवीसांची चर्चा होणार आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मुंबईत पावसामुळे झालेली पूरस्थिती, पाऊस आणि मिठी नदीसह विविध नागरी समस्यांवर चर्चा करण्यासाठी राज ठाकरे हे फडणवीसांच्या भेटीला जात असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
राज ठाकरे हे त्यांच्या कृष्णकुंज निवासस्थानाहून मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रवाना झाले. याआधीही त्यांची फडणवीसांसोबत एका हॉटेलमध्ये भेट झाली होती. गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोरदार सुरू आहे. तर दुसरीकडे राज ठाकरेंच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. विशेष म्हणजे, नुकताच उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंनी ‘मातोश्री’वर जाऊन शुभेच्छा दिल्या होत्या, ज्यामुळे ठाकरे बंधूंच्या जवळिकीत वाढ झाल्याचे संकेत मिळाले होती.
सार्वजनिकरित्या देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे हे नागरी समस्यांवर चर्चा करणार असले तरी पडद्यामागे राजकीय विषयांवर महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांच्या भेटींमधील गुप्त चर्चा नेहमीच गुलदस्त्यात राहतात. त्यामुळे या भेटीतून काही ठोस राजकीय निर्णय समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच काल झालेल्या बेस्ट पतपेढीच्या निवडणुकांच्या निकालाबद्दलही त्यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहेत
