ठाणेकरांसाठी शहरात लवकरच पॉड टॅक्सी सुरू होणार

ठाण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शहरात लवकरच वाहतुकीचा आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे. ठाण्यातील वाढत्या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी लवकरच शहरात पॉड टॅक्सी (Pod Taxis) सुरू होण्याची शक्यता आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत तसे संकेत दिले आहेत.

प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, पॉड टॅक्सीचा हा प्रकल्प किफायतशीर ठरेल. कारण सहा किमीच्या प्रवासासाठी प्रति व्यक्ती फक्त 30 रुपये मोजावे लागतील. रिक्षापेक्षाही हे भाडे कमी असल्याचा दावा करण्यात आला आहे. ठाणे शहराची लोकसंख्या 25 लाखांच्या पुढे गेली आहे. भविष्यात लोकसंख्या आणखी वाढू शकते. त्यामुळं रस्ते वाहतुकीला अनेक मर्यादा येऊ शकतात. त्यामुळं रस्ते वाहतुकीला पर्याय म्हणून पॉड टॅक्सीचा पर्याय आणण्यात आला आहे.

प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी ठाणे महापालिका मुख्यालयामध्ये शहरातील वाहतूक समस्या आणि इतर विषयांवर संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठीच्या उपाययोजनांचा ऊहापोह करताना पॉड टॅक्सीच्या पुढील वाटचालीचे सादरीकरणही करण्यात आले. आर्थिक व्यवहार्यता तपासून हा प्रकल्प मार्गी लावण्याचे प्रयत्न असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

वांद्रे ते कुर्ला स्थानकादरम्यान वांद्रे कुर्ला संकुलामधून पॉड टॅक्सी धावणार आहे. या पॉड टॅक्सीचे अंतर 8.80 किमी इतके असून यात 38 स्थानके असतील. एका पॉड टॅक्सीमध्ये सहा प्रवासी बसू शकतील. तर, कमाल 40 किमी प्रति तास इतका त्याचा वेग असणार आहे. या पॉड टॅक्सीमुळं वांद्रे ते बीकेसी प्रवास सुलभ होणार आहे.