महाराष्ट्र पोलीस दलात होणार मोठी भरती

महाराष्ट्रातील तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. पोलीस दलात लवकरच मोठी भरती होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोलीस दलात भरती करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. यामुळे राज्यातील तरुणांना रोजगाराची आणखी एक संधी उपलब्ध झाली आहे. तसंच देशसेवा करण्याची इच्छा असणारे पोलीस दलाच्या माध्यमातून हे स्वप्न पूर्ण करु शकतात. महाराष्ट्र पोलीस दलात (Maharashtra Police Force) सुमारे 15 हजार तरुणांची भरती कऱण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले 4 महत्त्वाचे निर्णय
अन्न, नागरी पुरवठा विभाग
राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य वितरण.

विमानचालन विभाग
सोलापूर-पुणे-मुंबई हवाई प्रवासाकरिता Viability Gap Funding निधी देण्याचा निर्णय

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारीत महामंडळांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनेतील जामीनदाराच्या अटी शिथिल. शासन हमीस पाच वर्षासाठी मुदतवाढ.

गृह विभाग
महाराष्ट्र पोलिस दलात सुमारे 15,000 पोलिस भरतीस मंजुरी

चर्चा एकनाथ शिंदे आणि भरत गोगावलेंच्या गैरहजेरीची

रायगडच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील 15 ऑगस्टच्या ध्वजारोहणाच्या मानपानावरून शिवसेनेत नाराजी असल्याची चर्चा आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नसताना, ध्वजरोहणासाठी यंदा गोगावले यांना मान मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र काल आलेल्या यादीत अदिती तटकरेंचं नाव असल्याने रायगडमधील शिवसेनेचे आमदार नाराज असल्याची माहिती मिळत आहे. भरत गोगावले यांनी आपण मुंबईबाहेर असून आज कॅबिनेटलाही उपस्थित राहणार नसल्याची माहिती दिली आहे.

दरम्यान भरत गोगावले यांनी आपण नाराज नसल्याचं म्हटलं आहे. “आजच्या कॅबिनेट बैठकीला मी अनुपस्थित राहणार आहे. काही कामानिमित्त मी दिल्लीत आलो असल्याने कॅबिनेटला जाणे शक्य होणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगरला रक्तदानासाठी असल्याने तेही कॅबिनेटला अनुपस्थित असतील. आमची नाराजी वैगेरे काहीही नाही, सगळं व्यवस्थित सुरू आहे,” असं ते म्हणाले आहेत.