भाजपच्या माजी नगरसेविकेचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप

पालघर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकांपूर्वी प्रभाग रचनेवरून मोठा वाद पेटला आहे. भाजपच्या माजी नगरसेविका अलका राजपूत यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ही प्रभाग रचना राजकीय दबावातून बदलल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

पालघर नगरपरिषदेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर होताच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. माजी नगरसेविका अलका राजपूत यांनी आरोप केला आहे की, ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी यांना मंत्रालयात बोलावून दबाव टाकला आणि मनमर्जीने प्रभाग रचना बदलण्यास भाग पाडले. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

५ ऑगस्टच्या रात्री उशिरापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव थांबवून बेकायदेशीर बदल करण्यात आले आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे 6 ऑगस्ट रोजी मंत्रालयात तो प्रस्ताव पाठवण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या बदलामुळे सत्ताधारी पक्षातील काही नगरसेवकांनाही फटका बसणार असल्याचे बोलले जात आहे. महायुतीतील भाजपचे माजी नगरसेवकही यामुळे नाराज असून जिल्हा पातळीवरील राजकीय गोटात मोठी खलबते सुरू आहेत. त्यातच पालकमंत्री गणेश नाईक यांनी देखील लक्ष घालून जिल्हा प्रशासनाला जाब विचारल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, पालघर नगरपरिषदेची प्रारूप प्रभाग रचना नियमानुसार झालेली आहे. आक्षेप किंवा सूचना असल्यास नागरिकांनी नोंदवाव्यात, असं मत पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी व्यक्त केलं आहे. प्रभाग रचनेवरील या आरोपांमुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालघरमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणात पुढे काय कारवाई होते? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.