ऐन गणेशोत्सवात कोकणवासियांना मोठा दिलासा !

बाप्पाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील प्रमुख सण आहे. कोकणात (Konkan) तर गणेशोत्सवाचा वेगळाच थाट आहे. लाखो चाकरमानी गणेशोत्सवासाठी गावी जाण्यासाठी निघाले आहेत. चाकरमान्यांचा प्रवास आरामदायी व्हावा यासाठी प्रशासनाकडून पावलं उचलण्यात आली आहेत. अशातच वंदे भारत एक्स्प्रेसबाबत एक महत्त्वाची माहीती समोर येतेय.

मुंबई ते मडगाव वंदे भारत आठ डब्यांची चालवण्यात येत होती. मात्र आता गणेशोत्सव काळात वंदे भारत एक्स्प्रेस तब्बल 16 डब्यांची करण्यात येणार आहे. त्यामुळं ऐन गणेशोत्सव काळात चाकरमान्यांचा प्रवास सोयीस्कर होणार आहे. वंदे भारतचे हे बदल तात्पुरत्या स्वरुपात करण्यात आले आहेत. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.

16 डब्यांची ही वंदे भारत एक्स्प्रेस 25,27,29 ऑगस्ट रोजी मुंबई सीएसएमटीहून आणि 26,28 आणि 30 ऑगस्ट रोजी मडगावहून धावणार आहे. ऐन गणेशोत्सवात मध्य रेल्वेने हा निर्णय घेतल्याने लाखो चाकरमान्यांना दिलासा मिळणार आहे. गणेश चतुर्थी उत्सवाच्या तीन दिवसांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटल्यानंतर ती दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, रत्नागिरी, कणकवली आणि थिविम येथे थांबा असेल. ही वंदे भारत सीएसएमटी येथून पहाटे 5.25 वाजता सुटेल आणि दुपारी 1.15 वाजता गोव्यातील मडगाव येथे पोहोचेल. तर परतीच्या मार्गावर मडगाव, गोवा येथून दुपारी 2.35 वाजता सुटेल आणि 10.25 वाजता मुंबईतील सीएसएमटी येथे पोहोचेल.