राज्य सरकारमध्ये मंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी आज शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क सुरु झालेले. उदय सामंत यांनी बैठकीनंतर आपण ही भेट का घेतली? त्यामागची कारणं स्पष्ट केली. “अखिल भारतीय नाट्य परिषद संस्थेमध्ये मुख्य विश्वस्त शरद पवार असून त्या संदर्भात बैठक होती. त्यामध्ये मी ही आहे. या कमिटीचे कोषाध्यक्ष, विश्वस्त आणि मी आम्ही सगळे या ठिकाणी आज या बैठकीसाठी उपस्थित होतो” असं उदय सामंत यांनी सांगितलं. “11 सप्टेंबरला शरद पवार यांनी यशवंत नाट्यमंदिर येथे धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी एक बैठक आयोजित केलेली आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून याचा मी एक भाग आहे. यामुळे मला शरद पवार यांनी याठिकाणी बोलवलं. यात कुठलीही राजकीय बाब नाही” असं उदय सामंत म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्था आणि बेस्ट पतपेढी निवडणूक निकालावर सुद्धा उदय सामंत बोलले. “ईव्हीएमच कारण जे होतं, ते बेस्ट पतपेढी निवडणुकीत नेस्तनाबूत झालं. कारण बॅलेट वर निवडणुका घेऊन देखील त्यांना भोपळाही फोडता आला नाही. 12000 मराठी मतदारांनी सपशेल युबीटीला नाकारलं. त्यांना 2000 मते देखील मिळवता आली नाहीत” असं उदय सामंत म्हणाले. “आता स्थानिक स्वराज्य संस्थेला सामोरे जात असताना कारण कुठच शोधायचं? तर ते जे आपण सांगताय की प्रभाग रचनेत जो प्रभाव आहे तो देवेंद्रजींनी आणि एकनाथ शिंदे यांनी टाकलेला आहे. स्वतःचा पराभव हा समोर दिसत असल्याने कोणावर तरी खापर फोडावं लागतं ते आता त्यांनी प्रभागावर फोडलं आहे” अस उदय सामंत म्हणाले.
“तुम्ही जर प्रभाग रचनेचा सगळ्यांनी मिळून अभ्यास केला तर तुम्हाला कळेल की प्रभाग रचनेचे काही नियम आहेत ते कोणालाही डावलता येत नाहीत. जसं मतदार यादीत सगळे लोक सांगतात की दुबार मतदार नोंदणी झालेली आहे किंवा घोटाळा झाला आहे. ते बदलण्याचे अधिकार देखील निवडणूक आयोगाने दिले आहेत. पंचायत निवडणुका आपल्या हातातून गेल्यात अशी जेव्हा आपली कहाणी होते. त्यावेळी कुठच्याही गोष्टीचा खापर हे कोणावर तरी फोडायचं असतं म्हणून काही लोक प्रभाग रचनेवर खापर फोडत आहेत” असं उदय सामंत म्हणाले.
