भारतातील पहिलं स्मार्ट-इंटेलिजंट गाव नागपूरमध्ये

नागपूर जिल्ह्यातील सातनवरी गावाला आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशातील पहिले स्मार्ट व इंटेलिजंट (Smart-Intelligent) गाव बनवण्यात आले आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्रालयांतर्गत कार्यरत व्हाईस ऑफ इंडियन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एंटरप्रायजेस आणि 24 भारतीय कंपन्यांनी एकत्र येऊन राज्य शासन व जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने हे यश मिळवले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचा शुभारंभ झाला. सातनवरी गावात ड्रोन तंत्रज्ञान, स्मार्ट सिंचन, टेलिमेडिसिन, बँक ऑन व्हिल, स्मार्ट टेहळणी अशा 18 सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

राज्यातील प्रत्येक तालुक्यातील 10 गावे स्मार्ट व इंटेलिजंट करण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात जवळपास 3,500 गावांना या योजनेचा लाभ मिळेल. यामुळे शेती, शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांमध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग होऊन ग्रामीण भागाचा कायापालट होईल, असे यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले.

सातनवरी गावात ड्रोनद्वारे खत-किटकनाशक फवारणी, माती परीक्षण, स्मार्ट सिंचन, आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित शिक्षण यासारख्या सुविधा उपलब्ध आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्न वाढेल, तर पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता सुधारल्याने आरोग्य सुधारेल. टेलिमेडिसिनमुळे गावातच वैद्यकीय सेवा मिळतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारतनेट प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर राज्यात महानेट प्रकल्प राबविला गेला. या प्रकल्पांमुळे ग्रामीण भागात इंटरनेट आणि तंत्रज्ञानाचा विस्तार झाला, ज्यावर स्मार्ट गावाची संकल्पना आधारित आहे.