इचलकरंजी,सर्वच राजकीय पक्षांना महानगरपालिका निवडणुकीचे वेध लागल्याचे दिसून येत आहेत. महापालिका प्रशासनाकडून लवकरच प्रभाग रचना जाहीर केली जाणार असल्याने याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, शहरातील काही माजी नगरसेवक तसेच इच्छुक उमेदवार देखील भाजपच्या वाटेवर असल्याचे दिसून येत आहेत. शिवाय याबाबत सहकारी बँकांच्या वार्षिक सभेत देखील नेतेमंडळींकडून यावर टिकाटिपण्णी होऊ लागल्याने निवडणुकीपूर्वी कोण-कोण पक्षप्रवेशाचा मुहूर्त साधणार याची उलट सुलट चर्चा वस्त्रनगरीत रंगताना दिसत आहे.
महानगरपालिकेने शहरातील प्रभाग रचना तयार करून ती निवडणुक आयोगाकडे सादर केली आहे. निवडणुक आयोगाच्या संमतीनंतर ती महापालिका प्रशासनाकडून जाहीर केली जाते. त्यानुसार आगामी काळात इचलकरंजी शहरातील प्रभाग रचना जाहीर होण्याची शक्यता आहे.
प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर यावर हरकती सूचना मागविल्या जातील. त्यानंतर हरकती सुचनांवर निर्णय घेतल्यानंतर प्रभाग रचना कायम केली जाणार आहे.त्यामुळे सध्या सर्वच राजकीय पक्षांना आणि इच्छुक उमेदवारांना याचे वेध लागले आहेत.
दरम्यान, काही माजी नगरसेवक त्याचबरोबर इच्छुक उमेदवार भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये महाविकास आघाडी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस मधील काहीजणांना समावेश आहे.
या पक्षप्रवेशाची चर्चा पक्ष पातळीवर होणे अपेक्षित असते. मात्र सध्या सहकारी संस्थांच्या वार्षिक सभेत यावर टोलेबाजी होताना दिसत आहे. सन्मती सहकारी बँकेच्या सभेत माजी आम. प्रकाश आवाडे यांनी बँकेचे संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विठ्ठल चोपडे यांना भाजप पक्ष प्रवेशाची ऑफर दिली आहे. अभ्यासू तसेच चांगले लोक येणार असतील तर त्यांचे नक्कीच स्वागतच करू असे त्यांनी म्हटले आहे.
आवाडे यांच्या या राजकीय टिपण्णीमुळे मात्र राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून आगामी काळात भाजपामध्ये कोणकोण प्रवेश करणार याकडे लक्ष लागले आहे.
