हातकणंगलेतील माणगाव ग्रा.प. उद्या तीन जानेवारी रोजी राबविणार ‘लेक लाडकी माझ्या गावची’ योजना

आजकाल सरकार अनेक योजना राबवीत आहे. त्यामुळे अनेक सर्व सामान्य जनतेला त्याचा लाभ होत आहे. हातकणंगलेतील माणगाव ग्रा.प. अशीच एक योजना गावात राबविणार आहे. माणगाव ग्रामपंचायतीने रस्ते, गटर्स अशा नेहमी होणाऱ्या कामांना बगल देऊन झालेल्या मासिक सभेत ‘लेक लाडकी माझ्या गावची’ ही अनोखी योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. गावातून लग्न होऊनजाणारी प्रत्येक कन्या सासरी सन्मानाने जावी यासाठी संसार सेट भेट म्हणून दिला जाणार आहे.

सुमारे अकरा हजार रूपयांच्या ह्या वस्तू असतील आणि हा खर्च सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्यांचे मानधन आणि ग्रामपंचायत फंड यासाठी वापरला जाणार असून क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या उद्या तीन जानेवारी रोजी असलेल्या जयंती निमित्ताने या योजनेचा शुभारंभ केला जाणार आहे. माणगाव ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये लेक लाडकी माझ्या गावाची योजना राबवणेबाबत चर्चा करण्यात आली. सदर मासिक सभेमध्ये सदस्यांनी सांगितले की, गावामध्ये रस्ते, गटर्स हॉल बांधकाम हि कामे वर्षानुवर्षे होत असतात.

पण आपल्या ग्रामपंचायतीच्यावतीने लग्न होऊन सासरी जाणा-या मुलीसाठी लेक लाडकी माझ्या गावाची ही योजना राबविण्यात यावी. सदर योजनेमध्ये लग्न होऊन सासरी जाणाऱ्या मुली करीता संसारसेट म्हणून मिक्सर कुकर, स्टील फिल्टर पीप, ताट, वाटी, पेले, तांब्या, कढई व झारा, अॅल्युमिनीअम पातेली, अॅल्युमिनीअम ईडली पात्र, बादली, घागर (स्टील), सांणशी, उलातने, पळी, झारा, सारी, भातवाडी, बरणी किटली, प्लेटा व चमचे, टिफिन डबा,भांड्याचा रॅक, अॅल्युमिनीअम डबे, लाकडी पाट, इलेक्ट्रिक इस्त्री, संसार मंगल कुटुंबसंवर्धन पुस्तिका संच इ. साहित्य देण्यात यावे, असे ठरले.

गावातील एकूण सरासरी २५ मुलींची लग्न होतात. एका मुली करीता अकरा हजार रुपये खर्च आहे. दोन लाख पंच्यात्तर हजार रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. सदर योजने करीता स्वतंत्र खाते उघडण्यात यावे,असे ठरले. मुलगीचे आई वडील माणगाव गावाचे रहिवाशी असणे बंधनकारक केले आहे.


मुलीचे लग्नावेळचे वय १८ वर्षे पूर्ण असणे बंधनकारक आहे व अर्जा सोबत जन्म दाखला किंवा वयाचा पुरावा जोडणे बंधनकारक आहे. या योजनेचा लाभ हा आई वडील व घरच्यांच्या मान्यतेने लग्न होऊन सासरी जाणाऱ्या मुलींना लागू असेल. लग्न ठरले नंतर ग्रामपंचायती रितसर अर्ज करून या योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी मुलीच्या आई वडिलांनी करावी.

माणगाव गावाचे रहिवाशी असणाऱ्या प्रत्येक कुटुंबास या योजनेचा लाभ मिळेल मात्र सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी वरील अटींची पूर्तता संबंधीत लाभार्थ्यास करावी लागेल, असे मासिक सभेमध्ये ठरवण्यात आले असून वरील सर्व विषयावर व अटीवर मासिक सभेमध्ये चर्चा करण्यात आली.