पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. लग्नाची बोलणी करण्यासाठी बोलावलेल्या तरुणाला मुलीच्या घरच्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये तरुणाचा मृत्यू झाला असून सदर प्रकरणात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीच्या कुटुंबाने लग्नाच्या प्रस्तावावर चर्चा करण्याच्या बहाण्याने तरुणाला घरी बोलावले होते पण नंतर त्याला मारहाण करून ठार मारले. रामेश्वर घेंगट असं मयत तरुणाचं नाव असून तो 26 वर्षांचा होता. ही घटना पुण्याजवळच्या पिंपरी-चिंचवड येथील सांगवी परिसरात घडली आहे. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणात तरुणीच्या वडिलांसह नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. तर दोन जण अजूनही फरार आहेत. त्या सर्वांविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
“रामेश्वर घेंगटला मारहाण करून ठार मारल्याप्रकरणी महिलेचे वडील प्रशांत सारसर यांच्यासह 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतर दोन आरोपींचा शोध सुरू आहे,” असे सांगवीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी सांगितलं.
पीडित तरुणी आणि मयत तरुणाचे प्रेमसंबंध होते. तरुणीच्या कुटुंबियांनी त्यांच्या लग्नाला विरोध केला होता. रामेश्वर हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याचा तरुणीच्या घरच्यांचा दावा होता. त्याच्यावर बलात्काराचा आरोप देखील होता. त्याच्याविरुद्ध लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा किंवा पोस्को अंतर्गतही गुन्हे दाखल करण्यात आल्याचं मुलीच्या घरच्यांचं म्हणणं होतं.
दोघांनीही लग्न करण्याचा हट्ट केल्याने, तरुणीच्या कुटुंबाने लग्नाच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी या तरुणाला घरी बोलावले, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण त्याच्या पालकांसह तरुणीच्या कुटुंबाला भेटायला गेला होता. त्या ठिकाणी दोन्ही कुटुंबांमध्ये भांडण सुरू होताच, तरुणीचे वडील आणि इतरांनी रामेश्वरला एका खोलीत नेले आणि त्याला बेदम मारहाण केली, असे पोलिसांनी सांगितले.
या मारहाणीत रामेश्वर गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांच्या प्रयत्नानंतरही त्याला वाचवण्यात यश आलं नाही. पीडित कुटुंबाने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. हा सारा प्रकार 22 जुलै रोजी घडल्याचा तरुणाच्या कुटुंबियांचा दावा आहे.
