मुंबईच्या रस्त्यावर पुन्हा एकदा टक-टक गँगची दहशत पाहायला मिळाली आहे. ही टोळी अत्यंत चलाखीने रस्त्यावरील धावत्या गाड्यांना लक्ष्य करुन कारमधील मौल्यवान वस्तू घेऊन फरार होते. मुंबईत असे काही प्रकार उघड झाले आहेत. नवी मुंबईच्या एका तरुणासोबत हा प्रकार घडला आहे. हा तरुण कुर्लातील SLR पुलावरुन खाली उतरत असताना अचानक या टोळीतील काही टोळक्यांनी त्याची कार अडवली अन् काही कळायच्या आतच कारमधील सामान लंपास केले.
ही संपूर्ण घटनेचा व्हिडिओ कारमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसतंय की ड्रायव्हरने पुलावरुन खाली उतरताना कारचा वेग कमी केला. तेव्हा अचानक एक तरुण कारजवळ आला आणि त्याने खिडकीवक जोरात टकटक केले. ड्रायव्हरने जेव्हा खिडकीची काच खाली केली तेव्हा अचानक दुसऱ्या खिडकीजवळ दुसरा व्यक्ती आला आणि त्याने कारचा विंडोजवळ टकटक केले.
ड्रायव्हरचे लक्ष भरकटल्याबरोबरच पहिल्या आरोपीने सीटवर ठेवलेला आयफोन घेऊन फरार झाला. पीडित तरुणाने दिलेल्या माहितीनुसार त्या लोकांनी आयफोन चोरला हे कळायच्या आतच ते घटनास्थळावरुन फरार झाले होते. घटनेनंतर पीडित तरुणाने विनोबा भावे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आत्तापर्यंतच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
पोलिसांनी लोकांना केले अवाहन
टक-टक गँग प्रकरणे यापूर्वी दिल्ली, मेरठबरोबर अनेक शहरात समोर आले होते. पोलिसांनी नागरिकांना अवाहन केले आहे की, कोणत्याही अनोळखी व्यक्तीने तुमच्या कारचा दरवाजा उघडण्यास किंवा खिडकी उघडण्यास सांगितले तर त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. लक्ष्य विचलित होऊ देऊ नका.
