एसटी महामंडळ तोट्यातून बाहेर केव्हा पडणार?

इस्लामपूर, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ गंभीर अवस्थेत उभे आहे. एसटी कधी फायद्यात चालली, अशी बातमी आजवर ऐकिवात आली नाही. उलट प्रत्येकवेळी ‘या वर्षी इतका तोटा, पुढल्या ‘वर्षी आणखी तोटा’ असे मथळेच दिसतात. याला चालक-वाहक जबाबदार आहेत, असेच आता म्हणावे लागेल.

हात दाखवा गाडी थांबवा हे घोषवाक्य कागदावरच…… रस्त्यावर साध्या गाड्या धावत असतील तरीही चालक वाहक प्रवाशांकडे दुर्लक्ष करून निघून जातात. वाट पाहीन पण एसटीनेच जाईन. ही खरी भूमिका प्रवाशांची असते. परंतु या सर्व नियमांना केराची टोपली दाखवत चालक-वाहक गाड्या मोकळ्या पळवत असतात. आधल्या मधल्या थांब्यावर प्रवाशी हात करत असतात परंतु चालक-वाहक मनमानी करत गाड्या तशाच रिकाम्या पळवत राहतात. प्रवाशांशी उर्मट बोलत असतात. आपण एसटीचे कर्मचारी आहोत हे विसरून ते मालक असल्यासारखे वागत असतात. परिणाम एसटी तोट्यात चालते. या चालक वाहकांवर नियंत्रण राहण्याच्या दृष्टीने ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.  एसटी महामंडळातील चालक, वाहक, क्लार्क व इतर कर्मचारी यांना इतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत अत्यल्प पगार मिळतो. त्यात पेन्शन नगण्य, मिळणाऱ्या थोड्याशा वेतनातून कुटुंब चालवणे शक्य होत नाही. शिक्षण, कर्ज, जीवनशैली या सर्व गरजा भागवण्यासाठी कर्मचाऱ्यांना ओव्हरटाईम करावा लागतो. त्यामुळे वाढलेला कामाचा ताण शरीरावर घाला घालतो आणि आरोग्याच्या तक्रारींमुळे अतिरिक्त खर्च ओढवतो तो वेगळाच.

 एकीकडे प्रवासी मोठ्या संख्येने एसटीची वाट पाहत असतात, पण अनेक वेळा गाड्या रिकाम्याच धावताना दिसतात. प्रवाशांना बस थांबवून घ्यावी म्हणावी तर चालक-वाहक थांबत नाहीत. हात दाखवला तरी गाडी सरळ पुढे निघून जाते. मागून धावून बस पकडणारे प्रवासी धडपड करत राहतात. जनतेच्या पैशाने धावणाऱ्या गाड्या जर प्रवाशांकडेच दुर्लक्ष करू लागल्या, तर एसटी कशी भरभराटीला जाणार हा गंभीर प्रश्न आहे. बाहेरच्या राज्यांत परिवहन महामंडळे फायद्यात चालू शकतात, तर महाराष्ट्रातच का नाही ? योग्य योजना व नियोजनाचा अभाव, चालक-वाहकांवरील नियंत्रण सैल, व्यवस्थापनाची उदासीनता, रिकाम्या गाड्या पळवण्याची प्रवृत्ती ही काही ठळक कारणे स्पष्टपणे दिसून येतात. त्यामुळे महामंडळाला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी योग्य नियोजन करण्याची गरज आज निर्माण झाली आहे.