केंद्रीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार सप्टेंबर महिन्यात मान्सूननं उत्तर भारतावर चांगलीच पकड मिळवली असून, बहुतांश राज्यांमध्ये थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. पुढील काही आठवडे उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसाचं प्रमाण धडकी भरवणाऱ्या प्रमाणात वाढणार असून, अशा स्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी थांबण्याचं आवाहन या राज्यांच्या प्रशासनानं केलं आहे.
उत्तराखंड, हिमाचल प्रदेश , दिल्ली ते अगदी जम्मू काश्मीरमध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्लीमध्ये प्रामुख्यानं पुढील 24 तासांत (3 सप्टेंबर 2025) अतिमुसळधार पावसामुळं स्थानिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तिथं अतीव उत्तरेकडे गंगेनं रौद्र रुप धारण केल्यानंतर त्यामागोमाग आता यमुनेलाही पूर आल्यानं दिल्लीपासून मथुरा, आग्रा यांसारख्या शहरांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. जुन्या रेल्वे पुलापाशी परिस्थिती बिकट असून, केंद्रीय जलआयोगाच्या पूर्वानुमानानुसार दिल्ली रेल्वे ब्रिज इथं यमुना इशारा पातळीवर वाहत आहे, ज्यामुळं येथील बहुतांश भाग जलमय झाले असून सद्यस्थितीला दिल्लीत 15 हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं आहे.
हिमाचलमध्ये सातत्यानं नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्या कारणानं पंजाबमधील 23 जिल्हे पूरग्रस्त घोषित करण्यात आले आहेत. भाखडा कालव्यातील जलस्तर 1677 फुटांवर असून, या भागातील अनेक गावांना संभाव्य धोका पाहता नागरितांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलं आहे. तिथं हिमाचल प्रदेशात कुल्लू, कसौली, सोलन अशा भागांमध्ये झालेल्या भूस्खलनामुळं अनेक नागरिकांचा मृत्यूही ओढावला आहे. हिमाचल, उत्तराखंडमध्ये अनेक रस्ते, राष्ट्रीय महामार्ग बंद असल्या कारणानं वाहतुकीवरही याचे परिणाम होत आहेत.
