सांगलीच्या इस्लामपूर शहराचं अखेर नामकरण कऱण्यात आलं आहे. आता इस्लामपूर हे शहर ईश्वरपूर नावाने ओळखलं जाणार आहे. राज्य सरकारच्या प्रस्तावानंतर केंद्र सरकारने इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातलं इस्लामपूर शहर ईश्वरपूर शहर या नावाने ओळखले जाणार आहे.
राज्य सरकारकडून अधिवेशनामध्ये मंत्री छगन भुजबळ यांनी इस्लामपूर शहराचा ईश्वरपूर शहर असं नाव करण्याची घोषणा करत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती दिली होती. त्यानंतर आता अखेर इस्लामपूर शहराचं ईश्वरपूर शहर नामकरण करण्यास केंद्राने देखील मान्यता दिली आहे. महायुती सरकारकडून राज्यातल्या अनेक जिल्ह्यांची नावे बदलण्यात आली आहेत, त्यामध्ये इस्लामपूर शहराचं नाव देखील बदलण्याची मागणी झाली होती. त्यानुसार महायुती सरकारने इस्लामपूर शहराचे नाव बदलण्याची प्रक्रिया केली होती. इस्लामपूर शहर हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांचा मतदारसंघ आहे.
हा निर्णय राजकीय प्रतीकात्मकता म्हणून पाहिला जात आहे. भाजप-नेतृत्वाखालील महायुती सरकारने हा निर्णय घेतला असून, विरोधक आणि काही मुस्लिम संघटनांनी याला धार्मिक भेदभावाची राजकीय खेळी म्हटले आहे. यामुळे महाराष्ट्रात राजकीय वाद सुरू आहे, ज्यात अन्य नाव बदल प्रस्ताव (उदा. छत्री निजामपूर ते रायगडवाडी) देखील समाविष्ट आहेत.
