क्रिकेट सामन्यादरम्यान बॉम्बस्फोट, एकाचा मृत्यू, अनेक जखमी

क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका क्रिकेट सामन्यादरम्यान भीषण बॉम्बस्फोट झाला. या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून काही लहान मुलांसह अनेक जण जखमी झाले आहेत. घटनेनंतर मैदानात गोंधळ उडाला आणि धुराचे लोट पसरले. या स्फोटाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ही घटना पाकिस्तानमधून खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बाजौर जिल्ह्यात घडली.

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट पूर्णपणे नियोजनबद्ध होता. बाजौर जिल्ह्यातील खार तालुक्यातील कौसर क्रिकेट ग्राऊंडवर हा हल्ला घडवून आणला गेला. सामना सुरु असतानाच अचानक मोठा स्फोट झाला आणि खेळाडू घाबरून मैदानाबाहेर पळताना दिसले.

या घटनेच्या आठवडाभर आधीच खैबर पख्तूनख्वा प्रदेशातील एका पोलिस ठाण्यावर क्वाडकॉप्टरच्या साहाय्याने हल्ला करण्यात आला होता. त्यावेळी एका हवालदारासह एका सामान्य नागरिकाला दुखापत झाली होती. पोलिसांच्या मते, दहशतवादी गटाकडून सलग हल्ल्याचा प्रयत्न सुरु आहे. बाजौर जिल्ह्याचे पोलिस अधिकारी वकास रफीक यांनी सांगितले की हा हल्ला स्फोटकांचा वापर करून काटेकोर नियोजनानुसार करण्यात आला. मृत आणि जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या घटनेची जबाबदारी स्वीकारलेली नाही.