महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. जाहीर करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीनुसार, राज्यातील १ हजार ५१६ विद्यार्थी मुलाखतीस पात्र ठरले आहेत. त्यातील सर्वाधिक १ हजार ४ विद्यार्थी पुणे केंद्रातील आहेत. त्या खालोखाल छत्रपती संभाजीनगर येथील १४३, नाशिक येथील १११, नवी मुंबई १०८, नागपूर १०४ आणि सर्वात कमी ४६ विद्यार्थी अमरावती येथील आहेत.
या परीक्षेचा कट ऑफ काही प्रमाणात वाढला असल्याचे दिसून येत आहे. खुल्या गटाचा कट ऑफ ५०७ असून, एसईबीसी ४९०, ओबीसी ४८५, एनटी ४६३, ईडब्ल्यूएस आणि एससी ४४५, तर एसटीचा कट ऑफ ४१५ आहे. ही परीक्षा २७, २८ आणि २९ मे २०२५ रोजी घेण्यात आली होती. MPSC राज्यसेवा २०२४ परीक्षेचे उद्दिष्ट ५२४ पदे भरण्याचे आहे. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी करावी लागेल. त्यानंतर त्यांची मुलाखतीसाठी निवड केली जाईल.
निकाल पाहाण्यासाठी सर्वप्रथम MPSC चे अधिकृत संकेतस्थळ mpsc.gov.in वर जा. होमपेजवरील “नवीनतम अपडेट्स” विभागात जा. “जाहिरात क्रमांक ०१३/२०२५ राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२४ – तात्पुरती गुणवत्ता यादी” नावाच्या लिंकवर क्लिक करा. MPSC राज्यसेवा निकाल २०२४ चा PDF स्क्रीनवर दिसेल. PDF फाइलमध्ये तुमचे नाव आणि रोल नंबर शोधा आणि तो डाउनलोड करा.
