पुण्यातील हिंजवडी येथील IT पार्क हे भारतातील सर्वात मोठ्या IT पार्कपैकी एक आहे. हिंजवडी आयटी पार्कमध्ये शेकडो नॅशनल तसेत इंटरनॅशलन आयटी कंपन्या आहेत. हिंजवडीच्या आयटी पार्कमध्ये कोट्यावधीची उलाढाल होते. हिंजवडीवरील ताण कमी करण्यासाठी आणि स्थानिक पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुणे विमानतळाजवळील पुरंदर येथे एक नवीन आयटी पार्क उभारण्याची तयारी सुरु केली आहे.
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रकल्पासाठी जमीन संपादन सुरू करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यांच्या सूचनांनुसार, उद्योग विभागाने महसूल विभागाला पत्र लिहून दिवे, चंबळली आणि कोडित गावांमधील सरकारी मालकीची जमीन हस्तांतरित करण्याची मागणी केली आहे. हिंजवडीला पायाभूत सुविधांमध्ये अडचणी येत आहेत. हिंडवडीतील अनेक आयटी कंपन्या महाराष्ट्राबाहेर स्थलांतरित होणार असल्याची चर्चा रंगली होती. यामुळे हिंजवडी आयटी पार्कवरील ताण कमी करण्यासाठी नव्या आयटी पार्कची घोषणा करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अलीकडेच हिंजवडीला भेट दिली आणि प्रशासनाला रस्ता रुंदीकरण आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले, कारण विलंबामुळे कंपन्या स्थलांतर करण्याचा विचार करत आहेत, असा इशारा दिला. महाराष्ट्र सरकारने पुण्याच्या पुरंदर तालुक्यात एक नवीन IT पार्क उभारण्यास हिरवा कंदील दिला आहे. हिन्जवडी IT पार्कवर वाढता ताण आणि ट्रॅफिक समस्या लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
पुरंदर येथे आयटी पार्क उभारण्याचा मूळ निर्णय एप्रिल 2025 चा आहे, पण अंमलबजावणीची हालचाल आत्ता पुन्हा सुरु झाली आहे. ज्यामध्ये पुरंदर तालुक्यातील दिवे, चांबळी, कोडीत येथील जागांची पाहणी सुरू करण्यात आली. या गावांमधील 1500 एकर जागेवर हे IT पार्क उभारले जाणार आहे. या पार्कमुळे हजारो नोकऱ्या उपलब्ध होणार असून, पुरंदर परिसरातील आर्थिक आणि सामाजिक विकासाला चालना मिळणार आहे. तसेच, हिन्जवडीवरील वाहतुकीचा भार कमी होण्यास मदत होईल. औद्योगिक विकास महामंडळ या प्रकल्पाची अंमलबजावणी करणार आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या काही वर्षांत पुरंदर हे पुण्याचे नवीन IT हब म्हणून ओळखले जाईल.
