उपाशी राहून काढले दिवस, बनला अभिनेता, आज 24 व्या वर्षी करोडोंचा मालक

बॉलिवूडमध्ये अनेक असे कलाकार आहेत ज्यांनी छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची सुरुवात केली आणि नंतर मोठ्या पडद्यावर नाव कमावले. त्यापैकीच एक लोकप्रिय चेहरा म्हणजे सिद्धार्थ निगम. आज तो एका आलिशान जीवनशैलीत राहतो, करोडोंचा मालक आहे, पण त्याचा प्रवास अत्यंत संघर्षमय आणि प्रेरणादायी राहिला आहे.

सिद्धार्थ निगमने आपल्या अभिनय करिअरची सुरुवात चाइल्ड आर्टिस्ट म्हणून केली होती. ‘चक्रवर्ती सम्राट अशोक’ या प्रसिद्ध टीव्ही मालिकेत त्याने बालपात्र साकारून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर त्याने ‘अलादीन’, ‘हीरो –गायब मोड ऑन’, ‘चंद्र नंदिनी’ अशा हिट मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि तो घराघरात पोहोचला.

आज जरी सिद्धार्थ आलिशान जीवन जगत असला तरी एक काळ असा होता की त्याच्याकडे खाण्यासाठीही पैसे नव्हते. एका मुलाखतीत त्याने स्वतः याचा खुलासा केला. तो म्हणाला, ‘मी इलाहाबादजवळच्या एका छोट्या गावात वाढलो. लहानपणी मला अभ्यासात अजिबात मन लागत नव्हते. त्यातच वडिलांचे निधन झाले आणि आमच्यावर संकट कोसळले. पैसे नसल्यामुळे अनेकदा आम्हाला उपाशी राहावे लागले’.

‘जरी अभ्यासात मी फारसा चांगला नसलो तरी खेळांमध्ये माझा नेहमीच उत्साह असायचा. त्यामुळे मला एका होस्टेलमध्ये राहण्याची संधी मिळाली आणि तिथे राहण्याबरोबरच जेवणाचीही सोय झाली’. मुंबईत आलो तरी त्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. एका टप्प्यावर त्याला ‘बॉर्न व्हिटा’ या ब्रँडच्या जाहिरातीत काम करण्याची संधी मिळाली आणि त्यातूनच त्याच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात झाली.

टीव्हीवर लोकप्रिय झाल्यानंतर सिद्धार्थ निगमला मोठ्या चित्रपटांमध्येही संधी मिळाली. त्याने ‘धूम 3’ या सुपरहिट चित्रपटात आमिर खानच्या बालपणीची भूमिका साकारली. पुढे त्याने सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.

आज सिद्धार्थ निगम हा वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी करोडोंचा मालक झाला आहे. विविध रिपोर्ट्सनुसार त्याची एकूण संपत्ती सुमारे ४२ कोटी रुपये इतकी असल्याचे सांगितले जाते. मुंबईत त्याचे एक आलिशान पेंट हाऊस असून तो आपल्या कुटुंबासोबत आणि मित्रपरिवारासोबत आनंदाने जीवन जगत आहे.