सध्या आशिया कप स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत आज भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील तणात वाढला आहे. या पार्श्वभूमीवर हा सामना होत असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेक विरोधी पक्षांनी या सामन्याला विरोध दर्शवला आहे. तर सोशल मीडियावरही बहिष्काराची मागणी होत आहे. आता यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत जोरदार हल्लाबोल केला आहे.
संजय राऊत(Sanjay Raut) यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यावर भाष्य केले. भारत पाकिस्तान या क्रिकेट सामन्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहांसह भाजप सरकारने परवानगी देणं ही त्यांच्या राष्ट्रभक्तीची दिवाळखोरी आहे. पहलगामचा हल्ला, त्यात २६ निरपराध लोक आणि त्यांच्या बायकांच्या कपाळावरील पुसला गेलेला सिंदूर यावर मोदींनी जो राजकीय छाती पिटण्याचा कार्यक्रम केला होता, त्याचं काय झालं. भाजपची राष्ट्रवाद आणि देशभक्ती हे ढोंग आहे, असा घणाघात संजय राऊत (Sanjay Raut)यांनी केला.
पैशाच्या खेळात कोणकोण गुंतलेत?
यापूर्वी अशाप्रकारच्या आंतरराष्ट्रीय सामन्यातून भारताने माघार घेतली आहे. दहशतवाद, श्रीलंका, पाकिस्तान अशा अनेक ठिकाणाहून माघार घेतली आहे. हे काही नवीन नाही. पण जय शाह यांचा इंटरेस्ट यात गुंतलेला आहे. जय शाह हे दुबईत आहेत पण ते आजच्या सामन्याला जाणार नाही, हे कितीतरी मोठे उपकार त्यांनी केलेले आहेत. तुम्ही सामना आयोजित केलेला आहे. तुम्ही प्रमुख आहात. नरेंद्र मोदी यांना राष्ट्रभक्तीबद्दल कोणतीही नैतिकता राहिलेली नाही आणि त्यांच्या अंधभक्तांनाही. बीजेपी के पापा वॉर रुकवा सकते है, पण भारत -पाकिस्तान क्रिकेट सामना थांबवू शकत नाही. रशिया युक्रेनचे वाद थांबवू शकता. ट्रम्पच्या दबावापोटी भारत पाकिस्तान यांच्यातील वॉरही ते थांबवू शकतात. पण भारत -पाकिस्तान क्रिकेट सामना थांबवू शकत नाही, अशी काय मजबुरी आहे. असा कोणता पैशाचा खेळ यात आहे. या पैशाच्या खेळात कोणकोण गुंतलेले आहे, असा सवाल संजय राऊत यांनी केला.
जय शाहांचा क्रिकेटपटूंवर दबाब
अनेक क्रिकेटपटूंनी याला विरोध केला आहे. जे क्रिकेटपटू मैदानात खेळणार आहेत त्यांना लाज वाटायला हवी. त्या खेळासाठी मिळणारी रक्कम घेताना ते आमच्या मारलेल्या निरपराध लोकांच्या रक्ताची ते किंमत घेतात. एक सामना नाही खेळलात, एका सामन्यावर बहिष्कार टाकलात तर काय मोठं आकाश कोसळणार होते. जय शाहा तुम्हाला फासावर देणार होते का? अमित शाह ईडी लावून तुरुंगात टाकणार होते का? याचे उत्तर द्यायला हवं. भारतीय क्रिकेट संघालाही हा सामना खेळायचा नाही. पण त्यांच्यावर जय शाहांचा दबाब आहे. काही क्रिकेटपटूंशीआम्ही बोललो. त्यांची मजबुरी आहे. अनेक माजी क्रिकेटपटूंनी यावर भाष्य केलं. पण माजी क्रिकेट यावर मत व्यक्त केलं. पण जय शाहांचा यावर दबाव आहे, असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला.
