विटा(vita) स्व. अनिलभाऊंनी टेंभूचे पाणी (Tembhu water)आणून या भागाचे नंदनवन करण्याचे स्वप्न बघितले आणि
प्रत्यक्षात हे स्वप्न साकार देखील झाले. आता शेतीला पाणी आल्यानंतर होणारा बदल लक्षात घेऊन मतदारसंघाच्या विकासाला चालना देण्यासाठी आवश्यक सुविधा उभारण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे करू, अशी ग्वाही आ. सुहास बाबर यांनी दिली आहे.
येथील खानापूर तालुका खरेदी विक्री संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा जय मल्टीपर्पज हॉलमध्ये पार पडली. यामध्ये संघाचे नामकरण आ. अनिलभाऊ बाबर खानापूर तालुका खरेदी विक्री संघ करण्याचा ठराव संमत करण्यात आला.
तालुक्यातील विकासासाठी विट्यात रेसिडिव्ह तपासणी आणि घाटमाथ्यावर द्राक्ष संशोधन प्रयोगशाळा लवकरच उभारण्याची घोषणा देखील आ. सुहास बाबर यांनी याप्रसंगी केली.
आ. बाबर पुढे म्हणाले, खानापूर तालुक्यात निर्यातक्षम द्राक्ष, डाळिंब आणि विविध फळांची शेती मोठ्या प्रमाणावर आहे. द्राक्ष निर्यातीसाठी औषधांचा अंश तपासण्यासाठी प्रयोगशाळा आपल्या तालुक्यात उभारण्याचा आपला प्रयत्न आहे. विट्यात कृषि विभागाच्या जागेवर लवकरच कृषि प्रयोगशाळा उभा राहिल, द्राक्ष संशोधन केंद्र उभारण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असे आमदार बाबर यांनी जाहीर केले. आता उद्योग उभा करण्यासाठी आपला प्रयत्न आहे. त्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून आपण प्रयत्न करीत आहोत, असेही आमदार बाबर म्हणाले.
अहवाल वाचन चेअरमन हेमंत बाबर यानी केले. संघाला या अर्थिक वर्षात ८२ लाख ४९ हजार नफा झाला असून सभासदांना १५ टक्के लाभांश देणार असल्याचे चेअरमन बाबर यांनी जाहीर केले. या कार्यक्रमास माजी सभापती विनोद गुळवणी, राजू मुल्ला, माजी पंचायत समिती सदस्य गणपतराव भोसले, कृष्णदेव शिंदे, संजय मोहिते, सयाजी धनवडे, नामदेव चव्हाण, गंगाधर लकडे, गजानन दिवटे, सुनिल पाटील, माजी सभापती सुशांत देवकर उपस्थित होते.
खरेदी विक्री संघाला स्व. अनिलभाऊंचे नाव
स्व. अनिलभाऊ बाबर यांनी योजनेचे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवून मतदारसंघात हरितक्रांती केली आहे. आज द्राक्ष, डाळिंब, ऊस, भाजीपाला या पिकांमधून मतदारसंघातील शेतकरी कोट्यावधी रुपयांची उलाढाल करत आहेत. स्वर्गीय अनिलभाऊ बाबर यांनी केलेल्या या कामाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खानापूर तालुका खरेदी विक्री संघाचे नामकरण आ. अनिलभाऊ बाबर खानापूर तालुका खरेदी विक्री संघ असे करण्याचा ठराव एकमताने संमत
करण्यात आला.
