हुंड्यासाठी होणाऱ्या छळामुळे पुण्याजवळच्या गावात राहणाऱ्या वैष्णवी गहवणे या विवाहीत महिलेने आत्महत्या केल्याच्या घटनेने प्रचंड खळबळ माजली होती. सासू, सासरे, नणंद आणि त्यांना साथ देणारा पती, यांच्या छळाला कंटाळून वैष्णवीने काही महिन्यांपूर्वी आयुष्य संपवलं. यामुळे राज्यातलं वातावरण खूप तापलं होतं, हे प्रकरण खूप गाजलं. त्याचे पडसाद अद्यापही उमटत असतानाच आता अशाच एका घटनेने जळगावही हादरलं आहे. सासरच्या छळाला कंटाळून 5 महिन्यांची गरोदर असलेल्या विवाहीत महिलेने गळफास लावून घेत आयुष्य संपवल्याचे उघड झाले आहे. वैष्णवीप्रमाणेच आणखी एकीचा बळी गेल्याने जळगवाकर हळहळत आहेत. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास सुरू आहे.
माझ्यामुळे माझे आई वडील टेन्शनमध्ये आले
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे गरोदर विवाहितेने गळफास घेऊन आयुष्य संपवलं. प्रज्ञा चेतन शेळके असे मयत विवाहितेचे नाव असून ती अवघ्या 22 वर्षांची होती. धक्कदायक गोष्ट म्हणजे पोटात बाळ असतानाही तिने जीव देण्याचा निर्णय घेतला म्हणजे तिचा किती छळ झाला असेल असा प्रश्न नागरिकांच्या मनात आहे.
गरोदर असलेल्या प्रज्ञाने मृत्यूपूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. पतीसह सासरच्या लोकांच्या त्रासाला, त्यांच्या छळाला कंटाळून मी आत्महत्या करत असल्याचा आरोप तिने या नोटमध्ये केला आहे. पाच महिन्यानंतर गर्भपात करण्यासाठी सासरच्यांचा दबाव होता.तसेच सासू सासरे यांनी केलेल्या छळामुळे मानसिक तणावात असल्याने आत्महत्या करत असल्याचे विवाहितेने मृत्यू पूर्वी लिहिलेल्या चिठ्ठी मध्ये नमूद केले होते. एवढंच नव्हे तर गर्भपात करण्यास नकार दिल्याने, पतीसह सासरच्या मंडळींनी मारहाण केल्याचा आरोपही तिने चिठ्ठीमध्ये केला आहे. माझ्यामुळे माझे आई वडील टेन्शनमध्ये आले, या मानसिक तणावात आत्महत्या करत दारूण सत्यही तिने चिठ्ठीमधून मांडलंय. तिच्या मृत्यूमुळे तिच्या माहेरच्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून ते शोकाकुल झाले आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. विवाहीतेच्या आत्महत्येमुळे जळगवाकर हादरले असून हळहळ व्यक्त होत आहे.
