मनोज जरांगेंनी दिल्लीवारीचा प्लान सांगितला. दिल्लीत मराठा समाजाचं एक दिवसाचं विशाल अधिवेशन भरवलं जाणार आहे. त्याची तारीख लवकरच जाहीर केली जाईल असं, मनोज जरांगे सांगितलं. दिल्लीत आंदोलन नसेल, तसंच कुठलीही मागणी नसेल. फक्त एक दिवसाचं मराठा समाजाचं राजधानी दिल्लीत अधिवेशन असेल, अशी माहिती मनोज जरांगेंनी दिली.
दिल्लीत देशातील मराठ्यांचं एक दिवसाचं अधिवेशन घेणार आहे. असं अधिवेशन पुन्हा होणार नाही असा विश्वास मनोज जरांगे यांनी व्यक्त केला आहे. “तारीख आम्ही लवकरच जाहीर करु. कारण खूप लोक जाणार आहेत. एखादा शेतकरी दुसऱ्या देशात जातो, व्यावसायिक, कारखानदार दुसऱ्या देशात जाऊन ऊस, उत्पन्नं कसं आहे पाहतात आणि मग बदल करतात. तसं आपण तेथील शेती, प्रगती, दळणवण, व्यवसाय कसं आहे हे पाहिलं पाहिजे. आपल्यात परिवर्तन होतं, हुशार होतो. प्रवाहप्रमाणे आपण वागायला सुरुवात करतो. ते नोकरीला कसे लागले, उत्तीर्ण कसे झाले हे पाहिलं पाहिजे,” असं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे.
“आपला दिल्लीचा ध्वज डौलाने कुठे फडकत आहे हे प्रत्यक्षात पाहिलं पाहिजे. इतिहास सांगणार, आपण ऐकणार, सांगणाऱ्याला एकट्यालाच माहित. आयुष्यभर कामं पडली आहेत. एक दिवस जायचं, आपण सगळे भाऊ देशातील एका ठिकाणी भेटायचं, कडकडून मिठ्या मारायच्या. हा खूप मोठा आनंदाचा सोहळा होणार आहे. यावेळी काही आंदोलन, मागणी नसेल,” असंही त्यांनी म्हटलं.
मनोज जरांगे यांनी अभ्यासकांवर टीकेची तोफ डागली. मुंबईतील आंदोलनातून मराठा समाजाला काहीच मिळालं नाही अशी टीका, मराठा समाजाचे काही अभ्यासक करत आहेत. त्यावर बोलताना ज्यांनी समाजाला काहीच दिलं नाही, ते आता आपल्यावर टीका करत असल्याचा आरोप जरांगेंनी केला. समाजानं त्यांच्यावरही विश्वास सोपवला होता. मात्र त्यांनी काय केलं असा सवाल जरांगेंनी केला. आपल्याला समाजापासून तोडायचा या टीकाकारांचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला.
