भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात आशिया कप 2025 चा सुपर 4 सामना रविवार 21 सप्टेंबर रोजी खेळवला गेला. या सामन्यात टॉस जिंकून भारताने पाकिस्तानला फलंदाजीचं आव्हान दिलं होतं. यावेळी पाकिस्तानने 5 विकेट गमावून 20 ओव्हरमध्ये 171 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी 172 धावांचं आव्हान मिळालं होतं. टीम इंडियाने हे आव्हान 6 विकेट राखून पूर्ण केलं. मात्र या सामन्यात पाकिस्तानच्या खेळाडूंनी अनेक वादग्रस्त गोष्टी केल्या ज्यामुळे सध्या त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल सुद्धा केलं जातंय. पाकिस्तानचा सलामी फलंदाज साहिबजादा फरहानने अर्धशतक केल्यावर गन-फायरिंग स्टाईल सेलिब्रेशन केलं तर हारिस रौफने राफेल पाडण्याचे इशारे करून भारतीय खेळाडू आणि प्रेक्षकांना उचकवण्याचं काम केलं. दोघांनी सामन्यादरम्यान केलेल्या या कृतीबाबत आयसीसीकडे तक्रार करण्यात आली आहे.
पाकिस्तानचा सलामी फलंदाज साहिबजादा फरहान टीम इंडियाच्या गोलंदाजीवर दोन वेळा बाद होता होता वाचला. मात्र अखेर त्याने 34 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. या अर्धशतकाचं सेलिब्रेशन करताना त्याने बॅट हातात बंदुकीप्रमाणे धरली आणि आकाशात गोळी झाडण्याप्रमाणे ऍक्शन केली.
हारिस रौफने दुसऱ्या इनिंगमध्ये भारतीय फलंदाज अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांच्याशी मैदानात वाद घातला. एवढंच नाही तर त्याने बाउंड्रीवर भारतीय प्रेक्षकांना पाहून वादग्रस्त इशारे केले आणि प्रेक्षकांना डिवचलं.
साहिबजादा फरहान आणि हारिस रौफ या दोघांविरुद्ध आयसीसीकडे तक्रार करण्यात आली आहे. आयसीसीच्या आचारसंहितेनुसार खेळाडूंनी त्यांच्या विरोधी संघाला आणि प्रेक्षकांना भडकावेल असं सेलिब्रेशन करू नये. खेळाच्या मैदानात राजकीय, धार्मिक किंवा हिंसक संदेश देणाऱ्या कृती करणं प्रतिबंधित आहे. ते खेळातील ‘स्पिरिट’ विरुद्ध आहे त्यामुळे अशी कृती करणाऱ्या कोणत्याही खेळाडूला दंड, निलंबन किंवा इशारा दिला जाऊ शकतो. तेव्हा आयसीसी साहिबजादा फरहान आणि हारिस रौफवर कारवाई करते का हे पाहणं महत्वाचं आहे.
