आशिया कप 2025 मध्ये पहिला फायनलिस्ट निश्चित झाला असून तो म्हणजे टीम इंडिया ! सुपर-4 फेरीतील महत्वाच्या सामन्यात भारताने बांगलादेशचा 41 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत दमदार पाऊल ठेवले. दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 168 धावा फलकावर टाकल्या. अभिषेक शर्माने खेचलेल्या आक्रमक 75 धावांच्या खेळीमुळे भारताने आव्हानात्मक धावसंख्या उभारली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत बांगलादेशाचा डाव केवळ 127 धावांत संपवला आणि विजय निश्चित केला. या विजयासह भारताने अंतिम फेरीचे तिकीट कापले आहे. मात्र आता सर्वांच्या नजरा एका प्रश्नावर खिळल्या आहेत त्या 28 सप्टेंबरला होणाऱ्या खिताबी लढतीत भारताचा प्रतिस्पर्धी पाकिस्तान असणार की पुन्हा एकदा बांगलादेश ?
या संपूर्ण स्पर्धेत भारताने अजूनपर्यंत एकही सामना गमावलेला नाही. UAE विरुद्धच्या विजयाने मोहिमेला सुरुवात झाली. त्यानंतर गटस्तरात पाकिस्तानला पराभूत करून मोठा आत्मविश्वास मिळवला. ओमानवर मोठा विजय मिळवत भारताने सुपर-4 गाठला. या टप्प्यात पुन्हा पाकिस्तानला 6 विकेट्सनी नामोहरम केले. त्यानंतर बांगलादेशलाही हरवत भारताने आपली विजयी मोहीम कायम ठेवली आणि थेट अंतिम फेरीत धडक दिली.
या विजयात अभिषेक शर्माचा खेळ निर्णायक ठरला. त्याने खेळलेल्या 75 धावांच्या तडाखेबाज खेळीमुळे भारताने 20 षटकांत 168 धावा उभारल्या. त्यानंतर गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत बांगलादेशाला 127 धावांवर गुंडाळले.
भारत फाइनलमध्ये पोहोचल्याने आता दुसऱ्या फायनलिस्टबाबत उत्सुकता वाढली आहे. सध्या सुपर-4 टेबलमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन्ही संघांचे 2-2 गुण आहेत. श्रीलंका मात्र दोन सामन्यांतील पराभवामुळे आधीच स्पर्धेतून बाहेर पडली आहे. त्यामुळे भारताच्या प्रतिस्पर्ध्यासाठी शर्यत केवळ पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात आहे.
25 सप्टेंबरला पाकिस्तान आणि बांगलादेश आमनेसामने येतील. त्या सामन्यात जिंकणारा संघ थेट भारताविरुद्धच्या फायनलमध्ये उतरेल. गुण समान असले तरी सध्या पाकिस्तानचा रनरेट बांगलादेशपेक्षा चांगला आहे, त्यामुळे त्यांना थोडा फायदा आहे. पण क्रिकेटमध्ये कोणत्याही क्षणी समीकरणं बदलू शकतात, त्यामुळे कोणता संघ अंतिम फेरी गाठतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
