महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील गावागावांत राहणाऱ्या नागरिकांसाठी एसटी महामंडळाने गुड न्यूज दिलीय. कामासाठी शहरात आलेल्यांना दिवाळीत आता त्यांच्या घरी जाता येणार आहे. यासाठी एसटीने जादा बस सोडण्याचा निर्णय घेतलाय. सणासुदीच्या काळात प्रवाशांना सुरक्षित आणि सुलभ प्रवासाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळ दरवर्षी विशेष बससेवा राबवते.
यंदाच्या दिवाळी सणानिमित्त प्रवाशांच्या वाढत्या गर्दीला सामोरे जाण्यासाठी महामंडळाने तब्बल 902 जादा बसगाड्या राज्यभरातील सहा विभागांत चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांना आपल्या गावी जाण्यासाठी मोठा दिलासा मिळणार असून, यंदाची दिवाळी आणखी गोड होणार आहे.
दिवाळीच्या सणाला मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिकसह राज्याच्या विविध भागांत प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढते. या काळात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि त्यांना वेळेत प्रवासाची सुविधा मिळावी यासाठी एसटी महामंडळाने विशेष बससेवेचे नियोजन केले आहे. या जादा बसगाड्यांमुळे प्रवाशांची गर्दी व्यवस्थित हाताळली जाणार असून, महामंडळाला आर्थिक लाभही होणार आहे.
या विशेष बससेवेमुळे प्रवासी आपल्या गावी वेळेत पोहोचून सणांचा आनंद घेऊ शकतील. महामंडळाच्या या नियोजनामुळे प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
यंदाच्या गणेशोत्सवात कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाने विशेष बससेवा राबवली. या काळात 15 हजार 388 फेऱ्यांमधून 5 लाख 96 हजारांहून अधिक प्रवाशांनी सुरक्षित प्रवासाचा आनंद घेतला. या विशेष सेवेतून महामंडळाला 23 कोटी 77 लाख रुपयांचा महसूल मिळाला, ज्यामुळे महामंडळाने अपघातविरहित आणि सुरक्षित वाहतुकीचा नवा विक्रम प्रस्थापित केला.
