दसरा- दिवाळीच्या या दिवसांमध्ये नोकरी करणाऱ्या प्रत्येकालाच पगारात काही रुपये वाढवून येण्याची अपेक्षा असते आणि हाच असतो ‘दिवाळी बोनस’. सध्या याच बोनससंदर्भातील आनंदवार्तेनं रेल्वे कर्मचारी आनंदात आहेत. कारण, दिवाळीच्या साधारण महिन्याभरापूर्वीच केंद्र शासनानं कर्मचाऱ्यांना बोनस स्वरुपात देण्यासाठी एका मोठ्या निधीला मंजुरी दिली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांच्या बोनससंदर्भात निर्णय घेण्यात आला. ज्यामध्ये क (C) आणि ड (D)श्रेणीतील कर्मचाऱ्यांना यंदाच्या वर्षासाठी 78 दिवसांचा बोनस दिला जाणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. या निर्णयामुळं रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाशीच नव्हे, तर दसरासुद्धा गोड झाला असं म्हणणं गैर ठरणार नाही.
उपलब्ध माहितीनुसार या निर्णयाचा थेट फायदा 11.5 लाख कर्मचाऱ्यांना मिळणार असून, बोनसची ही वाढीव रक्कम थेट कर्मचाऱ्य़ांच्या खात्यात लवकरात लवकर जमा केली जाणार आहे. रेल्वेतील विविध विभागांमध्ये आणि श्रेणीनुसार काम करणाऱ्या ट्रॅक मॅनेजर, लोको पायलट, ट्रॅक मॅनेजर (गार्ड), स्टेशन मास्तर, पर्यवेक्षक, तंत्रज्ञ, तंत्रज्ञ मदतनीस, पॉईंट्समॅन, मिनिस्ट्रीअल स्टाफ आणि इतर क श्रेणीतील कर्मचाऱ्यांना हा बोनस लागू असेल. रेल्वेमध्ये सेवेत असणाऱ्या नॉन गॅझेटेड कर्मचाऱ्यांना दरवर्षी केंद्राकडून ही खास मिळते आणि हे वर्षसुद्धा त्यास अपवाद ठरलेलं नाही. या रकमेचा उल्लेख ‘प्रोडक्टिविटी लिंक्ड बोनस (PLB)’ म्हणून केला जातो.
