कोकणात हाऊसफुल्ल शो, मुंबईत सलग बुकिंग, सर्वत्र ‘दशावतार’ चा जलवा

झी स्टुडियोजची प्रस्तुती असलेल्या आणि सुबोध खानोलकर लिखित दिग्दर्शित ‘दशावतार’ला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच आठवड्यात हाऊसफुल्ल शोजने धमाकेदार सुरुवात केलेल्या या चित्रपटाचा उत्साह तिसऱ्या आठवड्यातही अजिबात कमी झालेला नाही. उलट दिवसेंदिवस वाढतच आहे. बॉक्स ऑफिसवर भरभरून कमाई करत असलेला हा चित्रपट केवळ कथानकामुळेच नाही, तर प्रभावी मांडणी, दमदार अभिनय आणि आपल्या संस्कृतीशी जोडणाऱ्या आशयामुळेही रसिकांचे मन जिंकतोय.

मुंबईत मराठी चित्रपटांना थिएटर्स मिळत नाही याबद्दल कायम एक नाराजीचा सूर असतो . अनेकदा मराठी चित्रपटाला प्राईम लोकेशन्सवर संधीही मिळत नाही, मिळाली तरी फार काळ टिकत नाही असंही चित्र अनेकदा बघायला मिळतं. मात्र ‘दशावतार’ने या सगळ्या अडथळ्यांना पार करत मराठा मंदिर, रॉक्सी, स्टर्लिंग, इरॉस, रिगल, आयनॉक्स, पॅलेडियम पीव्हीआर, कस्तुरबा, मिलाप अशा थिएटर्समध्ये सलग तीन आठवडे हाऊसफुल्ल शोज दिले आहेत. विशेष म्हणजे या थिएटर्समध्ये साधारणपणे हिंदी, इंग्रजी वा गुजराती चित्रपटांचीच भर असते. अशा ठिकाणी मराठी चित्रपटाने एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठी सोबतच अमराठी प्रेक्षकांची गर्दी खेचली आहे, ही निश्चितच अभिमानाची बाब आहे.

याहून अधिक आनंदाची गोष्ट म्हणजे कोकणातील यश. साधारणपणे कोकणात चित्रपटांना फारसा प्रतिसाद मिळत नाही. अगदी बॉलिवूडचे मोठे चित्रपटही तिथे थिएटर्स हाऊसफुल्ल करत नाहीत. परंतु ‘दशावतार’ने हे समीकरण पूर्णपणे बदलून टाकले आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कुडाळ, सावंतवाडी, पेण, कणकवली, महाड, चिपळूण या सर्व भागातील प्रत्येक थिएटरमध्ये हा चित्रपट लागला आहे आणि प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली आहे. पर्यावरण, निसर्ग, कोकणी माणूस आणि दशावतार कलेवर आधारलेले कथानक स्थानिक प्रेक्षकांना इतके भिडले आहे की, ‘खूप काळाने आपल्या मातीची, आपल्या कलेची गोष्ट सांगणारा चित्रपट पाहायला मिळतोय’, अशी भावना तेथील प्रेक्षक व्यक्त करत आहेत.