कोल्हापूर-कलबुर्गी स्पेशल रेल्वेचे स्वागत सांगोला स्थानकावर शहीद अशोक कामटे संघटनेच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. खा. धैर्यशील मोहिते-पाटील, शहीद अशोक कामटे संघटना यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे कोल्हापूर कलबुर्गी-कोल्हापूर (गाडी क्र. ०१४५१ व ०१४५२) ही विशेष रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे. अनेक महिन्यांपासून प्रवाशांची मागणी आज पूर्णत्वास आली. या सेवेचा शुभारंभ(फ्लॅग ऑफ) सांगोला रेल्वेस्थानक येथे शीतलदेवी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाप्रसंगी आ डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या पत्नी डॉ. निकिता देशमुख उपस्थित होत्या. यावेळी फ्लॅग ऑफ समारंभ, रेल्वे इंजिन पूजन व चालकांचा सत्कार शाल, श्रीफळ देऊन करण्यात आला. या कार्यक्रमाला रेल्वे प्रशासनाचे अधिकारी, स्टेशन अधीक्षक, सांगोला शहर व तालुक्यातील नागरिक, व्यापारी, शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, सर्वस्य तसेच विविध नेतेमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रेल्वेसेवेमुळे सांगोला तालुक्यासह परिसरातील नागरिकांना कोल्हापूर, सोलापूर व कलबुर्गी या दोन्ही दिशांना प्रवासासाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. शेवटी आभार स्टेशन अधीक्षक गंगाकुमार सिंह यांनी मानले.
