हा खेळाडू झाला BCCI चा नवा अध्यक्ष

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला अखेर नवा अध्यक्ष मिळाला आहे. जम्मू-काश्मीरमधील माजी क्रिकेटपटू मिथुन मन्हास यांची बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. त्यांनी माजी क्रिकेटर आणि विद्यमान अध्यक्ष रोजर बिन्नी यांची जागा घेतली. या निवडीमुळे जम्मू-काश्मीर क्रिकेट इतिहासात नवा अध्याय लिहिला गेला आहे, कारण मन्हास हे बीसीसीआय अध्यक्ष होणारे त्या प्रदेशातील पहिलेच व्यक्ती ठरले आहेत.

बीसीसीआयच्या मुख्यालयात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. अध्यक्षपदी मिथुन मन्हास यांची नियुक्ती झाली, तर राजीव शुक्ला उपाध्यक्ष म्हणून कायम राहिले आहेत. कर्नाटक राज्य क्रिकेट संघाचे (KSCA) विद्यमान अध्यक्ष आणि भारताचे माजी फिरकीपटू रघुराम भट्ट यांची कोषाध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यांचा KSCA अध्यक्षपदाचा कार्यकाळ 30 सप्टेंबरला संपत आहे. त्याचप्रमाणे देवजीत सैकिया सचिवपदी कायम राहिले, तर प्रभतेज भाटिया यांची संयुक्त सचिव म्हणून निवड झाली आहे.

मिथुन मन्हास यांचा जन्म जम्मू-काश्मीरमध्ये झाला असला, तरी त्यांनी दिल्ली संघासाठी सर्वाधिक क्रिकेट सामने खेळले. ते मिडल ऑर्डर फलंदाज म्हणून ओळखले जात आणि आवश्यकतेनुसार ऑफ-स्पिन गोलंदाजी करून विकेटही घेत. त्यांनी 1997-98 हंगामात फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी एकूण 157 फर्स्ट क्लास सामने खेळून 9714 धावा केल्या, ज्यात 27 शतके आणि 49 अर्धशतके होती. लिस्ट-ए स्वरूपात त्यांनी 130 सामने खेळले, तर टी20 मध्ये 91 सामन्यांत सहभाग घेतला. 2007-08 हंगामात त्यांनी दिल्ली संघाचे नेतृत्व करत रणजी ट्रॉफी जिंकवून दिली. त्या हंगामात त्यांनी एकहाती 921 धावा केल्या होत्या.

मन्हास यांनी आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स (आता दिल्ली कॅपिटल्स), पुणे वॉरियर्स इंडिया आणि चेन्नई सुपर किंग्जसाठी खेळ केले. त्यांच्या सातत्यपूर्ण फलंदाजीमुळे त्यांना घरगुती क्रिकेटमध्ये मोठे यश मिळाले. मात्र, भारतीय राष्ट्रीय संघासाठी त्यांना कधी खेळता आले नाही, कारण त्या काळात मधल्या फळीमध्ये सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण आणि सौरव गांगुली यांसारख्या दिग्गजांची भक्कम जागा होती.

मिथुन मन्हास यांची बीसीसीआय अध्यक्षपदी निवड ही जम्मू-काश्मीर क्रिकेटसाठी ऐतिहासिक ठरली आहे. या निवडीमुळे केवळ त्यांच्या कारकिर्दीला नवे शिखर मिळाले नाही, तर त्या प्रदेशातील खेळाडूंनाही नवी प्रेरणा मिळाली आहे. आता भारतीय क्रिकेटचे प्रशासन त्यांच्या नेतृत्वाखाली कसे घडते आणि पुढील काळात कोणते नवे निर्णय घेतले जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.