मोहोळ तालुक्यातील भीमा, सीना व भोगावती नद्यांच्या महापुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतीसह पिके आणि पशुधनाचे प्रचंड नुकसान झाले. पिकांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून कोल्हापूर, सांगली पुराच्या वेळी एनडीआरएफच्या निकषापेक्षा चौपट मदत केली होती, त्याप्रमाणे एकरी ४० हजार रुपयांची आर्थिक मदत तत्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना वा संकटातून बाहेर काढावे, असे निवेदन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना पेनूर येथील राष्ट्रवादीचे रामदास चवरे यांनी दिले.
पूरग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी कृषिमंत्री भरणे यांनी मोहोळ तालुक्यातील पासलेवाडी येथे भेट दिली. यावेळी हे निवेदन देण्यात आले. मोहोळ तालुक्यात मागील पंधरा दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे भीमा, सीना व भोगावती नद्यांना प्रचंड महापूर आल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. यामध्ये शेतातील पिके, जनावरे, घरे, धान्ये वाहून गेली आहेत.
लोकांचा संसार पूर्णपणे पाण्यात वाहून गेला आहे. तसेच शेतातील फळ पिके संपूर्णपणे वाया गेली आहेत. तरी सर्व तालुक्यातील पिकांचे सरसकट तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चवरे यांनी केली. यावेळी तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, बाजार समितीचे उपसभापती प्रशांत बचुटे, महावीर चटके, सज्जन लोहे आदी उपस्थित होते.
