घरात आग लागली अन्…; टीव्ही अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचे निधन

टीव्ही इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. राजस्थानच्या कोटा येथे लागलेल्या आगीत दोन चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यातील एक बालकलाकार म्हणून छोट्या पडद्यावर काम केले आहे. वयाच्या 10 व्या वर्षीच छोट्या पडद्यावर ओळख मिळवणाऱ्या वीर शर्मा आणि त्याचा मोठा भाऊ शौर्य शर्मा यांचा मृत्यू झाला आहे. धुरामुळं श्वास गुदमरुन दोन्ही चिमुरड्यांना प्राण गमवावा लागला आहे. या चिमुकल्यांची आईदेखील अभिनेत्री आहे.

वीर शर्माला सर्वाधिक ओळख टीव्ही शो वीर हनुमानमुळं मिळाली होती. या मालिकेत त्याने बाल लक्ष्मणची भूमिका साकारली होती. त्यांचे बोलके डोळे आणि उत्कृष्ट संवाद फेकण्याची कला यामुळं प्रेक्षकांचा तो गळ्यातील ताईत बनला होता. इतकंच नव्हे तर येत्या काळात सैफ अली खानच्या एका आगामी चित्रपटात त्याच्या बालपणीची भूमिका साकारणार होता. या व्यतिरिक्त सोनी सब टिव्हीच्या श्रीमद रामायणमध्ये पुष्कल ही महत्त्वाची भूमिका साकारत होता. इतक्या लहान वयात एकापेक्षा जास्त प्रोजेक्ट मिळणे हीच त्याच्या कामाची पोचपावती होती.

रिपोर्टनुसार, आग चौथ्या मजल्यावर लागली होती. आग लागली तेव्हा दोन्ही मुलं एकटेच घरात होते. पोलिस अधिकाऱ्यांनीदिलेल्या माहितीनुसार, घरात धुर जास्तप्रमाणात पसरला त्यामुळं दोघांनाही श्वास घेता आला नाही. त्यामुळं गुदमरुन दोघांचा मृत्यू झाला आहे. शेजाऱ्यांनी घरातून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट येत असल्याचे पाहून दरवाजा तोडला. तेव्हा दोन्ही मुलं बेशुद्ध पडली होती. त्यांना लगेचच रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

वीर आणि शौर्य यांची आईदेखील अभिनेत्री आहे. रीता शर्मा असं त्यांचं नाव आहे. त्यांनीदेखील अनेक मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. क्रॅश कोर्स, क्राइम्स अँड कन्फेशन आणि चाहते या सिनेमात त्या दिसल्या होत्या. तर वीर आणि शौर्य यांचे वडिल कोटाच्या एका प्रमुख कोचिंग क्लासमध्ये शिकवतात. जेव्हा घटना घडली तेव्हा ते एका कार्यक्रमासाठी गेले होते. तर रीता मुंबईला हो्त्या. या घटनेनंतर मुलांच्या वडिलांनी डोळे दान करण्याचा निर्णय कुटुंबांनी घेतला आहे.