हातकणंगले, हातकणंगले नगरपंचायतीची निवडणूक होऊ घातली आहे. त्या दृष्टीने सर्वच पक्षांच्या नेतेमंडळींनी कंबर कसली आहे. मात्र याच पार्श्वभूमीवर हातकणंगलेतील भाजपमध्ये जुने व नवे कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. उद्या होणाऱ्या आधार कार्ड संबंधी मेळाव्याच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या पत्रिकेत भाजपमध्ये असलेल्या ज्येष्ठ नेत्याचा फोटो वगळून काही जुन्या कार्यकर्त्यांनी आपले फोटो त्याच ठिकाणी लावून पोस्टर सोशल मीडियावर प्रसारित केल्याने वातावरण तापले आहे.
या प्रकरणामुळे हातकणंगलेत भाजपमध्ये गटबाजीचे पडसाद उमटू लागले असून, आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पोस्टरबाजीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.सोशल मीडियावर या वादाची चर्चा सुरू असून पक्षातील अंतर्गत मतभेद उघड होत असल्याचे चित्र दिसत आहे. निवडणुकीच्या तोंडावर निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे भाजपच्या स्थानिक पातळीवरील रणनीतीवर परिणाम होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, सोमवारी होणाऱ्या राजस्व शिबिराच्या कार्यक्रम पत्रिकेतील फोटो व नावारून भाजपच्या जुन्या व नव्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली आहे. नगर पंचायतीच्या आगामी निवडणुकीत याचे पडसाद उमटण्याची शक्यता असल्याने याची चांगलीच चर्चा रंगली आहे. नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी इच्छुक नेतेमंडळींकडे उमेदवारीसाठी साकडे घालत असताना पक्षातील काही कार्यकर्ते कार्यक्रम पत्रिकेतून उणीदुणी काढत खाली खेचण्यांच्या प्रयत्नात असल्याने पक्षाला याचा फटका बसू शकतो, अशी चर्चा आहे.
