आशिया कप 2025 चा किताब जिंकूनही टीम इंडियाला विजयोत्सव साजरा करता आला नाही. कारण, एशियन क्रिकेट कौन्सिल आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी सामना संपताच भारताची जिंकलेली ट्रॉफी आणि खेळाडूंना मिळणारी मेडल्स घेऊन पळ काढला. या प्रकारानंतर मोठा गदारोळ माजला असून बीसीसीआयने मोहसिन मोहसिन नक्वीला ‘लास्ट वॉर्निंग’ देत ट्रॉफी आणि मेडल्स तातडीने परत करण्याची मागणी केली आहे.
फायनलमध्ये पाकिस्तानवर 5 गडी राखून मात करून भारताने नवव्यांदा आशिया कप आपल्या नावावर केला. मात्र ट्रॉफी स्वीकारताना टीम इंडियाने मोहसिन नक्वींकडून ती न घेण्याचा निर्णय घेतला. खेळाडू अमिरात क्रिकेट बोर्डाचे उपाध्यक्ष खालिद अल जरोनी यांच्याकडून ट्रॉफी घ्यायला तयार होते. पण नक्वींनी त्याला अडथळा आणत ट्रॉफी व मेडल्स स्वतःकडे ठेवून हॉटेलमध्ये नेले. पाकिस्तानचे अंतर्गत व्यवहार मंत्री असलेले नकवी यापूर्वी भारताविरोधात वादग्रस्त विधाने करत आले आहेत.
बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “भारताने ACC चेअरमनकडून ट्रॉफी न घेण्याचा विचारपूर्वक निर्णय घेतला होता. मात्र नक्वींना मेडल्स आणि ट्रॉफी घेऊन जाण्याचा कोणताही अधिकार नाही. ही क्रीडाभावनेला विरोध करणारी कृती आहे. आम्ही अपेक्षा करतो की भारताची ट्रॉफी आणि मेडल्स तातडीने परत दिली जातील.” त्यांनी पुढे सांगितले की, जर ट्रॉफी परत न आली तर नोव्हेंबरमधील आयसीसीच्या बैठकीत बीसीसीआय या विषयावर अधिकृतरीत्या विरोध नोंदवेल. भारताने पाकिस्तानला धूळ चारत आशिया कपचे विजेतेपद पटकावले असले तरी ट्रॉफी आणि मेडल्स परत मिळावेत, यासाठी बीसीसीआयने कडक पावलं उचलली आहेत.
