अकोला जिल्ह्यातील पारस या छोट्याशा गावाने धार्मिक क्षेत्रात एक मोठी ओळख निर्माण केली आहे. पारस येथील गणेश लांडे यांनी आपल्या गावात महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिराची हुबेहुब प्रतिकृती उभारली आहे. या मंदिराच्या दर्शनाला आल्यानंतर भाविकांना जणू तुळजापूर गाठल्याचा अनुभव येतो.
गणेश लांडे यांच्या आईची तुळजाभवानी मातेचे मंदिर उभारण्याची अनेक वर्षांची इच्छा होती. त्यांची ही इच्छा त्यांचे पुत्र गणेश लांडे यांनी पूर्ण करत तुळजाभवानी मातेचा मंदिर उभारले आहे. पारस येथील या भव्य मंदिराची उभारणी अत्यंत बारकाईने करण्यात आली असून तुळजापूर येथील मूळ मंदिराच्या आराखड्याचा अभ्यास करून त्याच धर्तीवर शिल्पकला व वास्तुरचना करण्यात आली आहे. देवीची ही मूर्ती तिरुपती बालाजीहून आणण्यात आली आहे. मंदिराचा कळस, देवीचा मुकुट आणि मंदिराच्या गाभाऱ्यात असलेला स्तंभ सोन्याचा आहे.
मंदिरातील गर्भगृह, शिखर, नक्षीकाम आणि सभामंडप पाहताना भाविकांना खरी तुळजापूर यात्रा केल्याची अनुभूती मिळते. पारस गावात हे मंदिर उभारल्यामुळे जिल्ह्यासह राज्यभरातील भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः वृद्ध, महिला आणि लहान मुलांना आता दूरवरचा प्रवास न करता तुळजाभवानीचे दर्शन घेण्याची संधी मिळते आहे. मंदिरात दररोज सकाळ-संध्याकाळ आरतीसोबत नित्य पूजाअर्चा केली जाते. नवरात्रोत्सव, चैत्र पौर्णिमा आणि विशेष धार्मिक उत्सवांमध्ये येथे भाविकांची मोठी गर्दी उसळते. यामुळे पारस गाव हळूहळू धार्मिक पर्यटन केंद्र म्हणूनही नावारूपाला येत आहे.
स्थानिक ग्रामस्थ आणि भक्तांनी या मंदिराच्या निर्मितीबद्दल अपार आनंद व्यक्त केला आहे. गावातच तुळजापूरच्या तुळजाभवानीचे दर्शन घडत असल्याने गावकऱ्यांना देखील खूप समाधान वाटतंय. पारस येथे उभारलेले हे तुळजाभवानीचे मंदिर अकोला जिल्ह्यासाठी अभिमानाचे केंद्र बनले असून पुढील काळात येथे भाविकांचा ओघ वाढणार हे निश्चित आहे. आता या ठिकाणी राजकीय नेत्यांची वर्दळ वाढली आहे शेतकऱ्यांवरील संकट दूर करण्याची प्रार्थना देवीला बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी केली आहे
