भारतीय वेटलिफ्टिंगचा चेहरा बनलेली मीराबाई चानूने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर ठसा उमटवला आहे. नॉर्वेमधील फोर्डे येथे सुरू असलेल्या वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये तिने 199 किलो वजन उचलून रौप्य पदक जिंकले. हा या स्पर्धेच्या इतिहासातील तिचा तिसरा पदक असून ती सर्वाधिक जागतिक पदके जिंकणाऱ्या भारतीय वेटलिफ्टरपैकी एक ठरली आहे. तिचं हे तिसरे विश्वस्तरीय पदक आहे.
चानूने याआधी 2017 मध्ये अमेरिकेतील अनाहाईम येथे झालेल्या स्पर्धेत 48 किलो गटात सुवर्णपदक पटकावले होते, तर 2022 मध्ये बोगोटा येथे 49 किलो गटात रौप्य मिळवले होते. यंदाच्या स्पर्धेतही तिने आपला फॉर्म कायम ठेवत देशासाठी आणखी एक गौरवशाली पदक जिंकले.
या वेळी 48 किलो गटात चानूने स्नॅचमध्ये 84 किलो तर क्लीन अँड जर्कमध्ये 115 किलो असा एकूण 199 किलो वजन उचलले आणि दुसरे स्थान मिळवले. उत्तर कोरियाच्या रि सांग गुम हिने 213 किलो वजन उचलून सुवर्ण पदक पटकावले. तर चीनच्या थान्याथन हिच्यासोबत चानूची कांटेची टक्कर पाहायला मिळाली. स्नॅच राउंडमध्ये थान्याथन 4 किलोने पुढे होती, मात्र क्लीन अँड जर्कमध्ये चानूने दमदार कामगिरी करत तिला मागे टाकले आणि 1 किलोच्या आघाडीने रौप्य पदक आपल्या नावावर केले. थान्याथनला शेवटी कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
या ऐतिहासिक यशानंतर मीराबाई चानूने थेट आपल्या प्रशिक्षक विजय शर्मा यांच्याकडे धाव घेत त्यांचे आभार मानले. गेल्या काही वर्षांत झालेल्या दुखापतींमुळे तिच्या कारकिर्दीसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते, पण तिच्या जिद्दीने तिला पुन्हा जागतिक स्तरावर पोहचवले. अलीकडेच अहमदाबादमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपमध्ये तिने सुवर्ण जिंकत पुनरागमनाची झलक दाखवली होती आणि आता जागतिक स्तरावर रौप्य पदक जिंकून तिने भारतीय वेटलिफ्टिंगचा झेंडा पुन्हा उंचावला आहे.
