कट्टर समर्थकाचा अजितदादा गटात जाहीर प्रवेश……..

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक जमील बागवान (Jameel Bagwan) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) गटांत प्रवेश केला.सांगली शहर-जिल्हा कार्याध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली.

माजी मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांचे कट्टर समर्थक म्हणून बागवान यांची ओळख होती. मात्र त्यांनी अजितदादा गटामध्ये प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दरम्यान, पक्षाने दिलेली जबाबदारी निःस्वार्थपणे पार पाडू पक्षसंघटन मजबूत करण्याची ग्वाही बागवान यांनी दिली. जमील बागवान हे राष्ट्रवादीचे माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांचे बंधू आहेत.

मिरज शहरातील राष्ट्रवादीचे संघटन भक्कम करण्यात जमील बागवान यांचा सिंहाचा वाटा आहे. दरम्यान, पक्षाने त्यांना स्वीकृत नगरसेवक पदाची संधीही दिली होती. या काळात त्यांनी कोट्यवधी रुपयांची कामे केली. मात्र स्थानिक नेतृत्वाबाबत त्यांची नाराजी होती. राष्ट्रवादीत त्यांना डावलण्यात येत होते. त्यामुळे ते नाराज होते.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर त्यांना अजितदादा पवार गटांकडून गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू होते. माजी महापौर इद्रिस नायकवडी यांनी यासाठी प्रयत्न सुरू केले होते. अखेर मुंबई येथे त्यांनी अजित गटात प्रवेश केला. त्यांच्यावर सांगली शहर-जिल्हा कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, सांगली शहर-जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे, माजी महापौर तथा राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष इद्रिय नायकवडी यांच्यासह महापालिका क्षेत्रातील समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.