भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि माजी प्रशिक्षक राहुल द्रविड़ यांच्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. त्यांच्या दोन्ही मुलांनी समित आणि अन्वय द्रविड क्रिकेटच्या मैदानात धमाल माजवली आहे. ‘द वॉल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द्रविड़ यांच्या धाकट्या मुलाला, अन्वय द्रविड़ला, कर्नाटकच्या ज्युनियर क्रिकेट संघात मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. त्याची कर्नाटक अंडर-19 संघाच्या कर्णधारपदी विनू मांकड ट्रॉफीसाठी निवड करण्यात आली आहे.
समित द्रविडने 2024 साली भारताच्या अंडर-19 संघात स्थान मिळवलं होतं, मात्र दुखापतीमुळे तो आपलं पदार्पण करू शकला नव्हता. दुसरीकडे, अन्वय द्रविडनेही आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे निवडकर्त्यांचं लक्ष वेधलं आणि त्याला संघाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. समित हा फलंदाज आणि ऑलराउंडर आहे, तर अन्वय आपल्या वडिलांप्रमाणेच विकेटकीपर आहे.
अन्वयने 2024 मध्ये कर्नाटकसाठी अंडर-16 स्पर्धेत खेळताना केवळ 6 सामन्यांच्या 8 डावांमध्ये तब्बल 459 धावा केल्या. त्याच्या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे त्याला आता अंडर-19 संघात बढती देण्यात आली आहे. या ज्युनियर स्पर्धेत तो कर्नाटक संघाचं नेतृत्व करणार आहे.
अन्वय द्रविड (कर्णधार), नितीश आर्य, आदर्श डी उर्स, एस मणिकांत, प्रणीत शेट्टी, वसव वेंकटेश, अक्षत प्रभाकर, सी वैभव, कुलदीप सिंह पुरोहित, रतन बीआर, वैभव शर्मा, केए तेजस, अथर्व मालवीय, सनी कांची, रेहान मोहम्मद.
दरम्यान, अनुभवी फलंदाज मयंक अग्रवालला आगामी रणजी हंगामासाठी कर्नाटक रणजी संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. तो सध्या राष्ट्रीय संघाबाहेर आहे. करुण नायरची रणजी संघात पुनरागमन झालं आहे. नायरने काही काळापूर्वी विदर्भ संघात प्रवेश घेतला होता, मात्र नंतर इंग्लंड दौर्यासाठी भारतीय संघात परत आला. अपेक्षित कामगिरी न झाल्याने त्याला वेस्टइंडीज मालिकेनंतर टेस्ट संघातून वगळण्यात आलं आणि भारत ‘ए’ संघातही त्याला स्थान मिळालं नाही.
कर्नाटकच्या रणजी संघात श्रेयस गोपाल, व्याशक विजयकुमार, अभिनव मनोहर यांसारखे अनुभवी खेळाडू देखील आहेत. व्याशक विजयकुमार टी20 संघाचा भाग राहिला असला तरी त्याने अजून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले नाही.
