भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून म्हणजेच बीसीसीआयकडून एक मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यापूर्वी केवळ सौरव गांगुलीकडे सोपवण्यात आलेली एक खास जबाबदारी बीसीसीआयकडून माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे राहुल द्रविड, गौतम गंभीर, व्ही. व्ही. एस लक्ष्मण, अनिल कुंबळे यासारख्या दिग्गजांकडे सोपवण्यात आलेल्या जबाबदारीपेक्षाही ही जबाबदारी अधिक मोठी असणार आहे.
बीसीसीआयचे नवीन अध्यक्ष कोण होणार, याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. आता या पदावर एका तपापूर्वी निवृत्त झालेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विचार सुरु आहे. बीसीसीआयचे अध्यक्षपदाची माळ सचिन तेंडुलकरच्या गळ्यात पडू शकते, अशी जोरदार चर्चा आहे. सचिनकडे एवढी मोठी जबाबदारी सोपवण्यासंदर्भात अनौपचारिक चर्चाही झाल्याचे सूत्रांनी सांगितल्याचं वृत्त ‘दैनिक जागरण’ने ‘एक वरिष्ठ माजी खेळाडू’ असा उल्लेख करत दिलं आहे. दरम्यान, बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा; तसेच निवडणूक 29 सप्टेंबरला होणार आहे. त्याच दिवशी नव्या अध्यक्षांची निवड होईल.
या पदावर खरोखरच सचिनची निवड झाली तर, मागील दीड दशकांमध्ये निवृत्त झालेल्या क्रिकेटपटूंना बोर्डात नेतृत्व करण्याची संधी देण्याची ही दुसरी वेळ ठरेल. 2019 मध्ये भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली बीसीसीआयचे अध्यक्ष झाला होता. त्यानंतर 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघातील रॉजर बिन्नी यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली. बीसीसीआयच्या नियमांनुसार 70 वर्षांची वयोमर्यादा पूर्ण झाल्यानंतर बिन्नी यांनी अलीकडेच पद सोडले. सध्या उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांच्याकडे कार्यवाहक अध्यक्ष म्हणून पदभार सोपवण्यात आला आहे. अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष, संयुक्त सचिव, कोषाध्यक्ष आणि आयपीएल अध्यक्ष यासारख्या प्रमुख पदांसाठी अधिकृत निवडणुका सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) होणार आहेत.
सध्या सुरु असलेल्या चर्चांनुसार, अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी दरम्यान सचिनशी अनौपचारिक बोलणं झालं आहे. एका वरिष्ठ राजकीय व्यक्तीने अलीकडेच इंग्लंडमध्ये सचिनची भेट घेऊन बीसीसीआयमधील सर्वोच्च पद स्वीकारण्यासंदर्भात चर्चा केल्याचे मानले जात आहे. या ऑफरला सचिनचा प्रतिसाद, होकारार्थी आहे की नकारार्थी हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
केंद्र सरकारने मागील काही काळापासून क्रीडा संघटनांमध्ये खेळाडूंचे प्रतिनिधित्व वाढवण्यावर भर दिल्याचं दिसत आहे. ऑलिम्पिक पदक विजेत्या राज्यवर्धन सिंह राठोड यांच्याकडे केंद्रीय क्रिडा मंत्रीपद सोपवण्यात आलं होतं. सध्या, माजी धावपटू पी.टी. उषा भारतीय ऑलिंपिक असोसिएशनच्या प्रमुख आहेत. या ट्रेण्डनुसार सचिनचा बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी विचार सुरु असल्याचं सांगितलं जात आहे. मागील काही काळात खेळाडूंनी खेळांमधील प्रशासकीय बदलांमध्ये दिलेलं योगदान सकारात्मक ठरलं असल्याने स्वत: खेळ खेळलेल्या आणि जाणकार माजी क्रिकेटपटूची निवड करण्याचा विचार असल्याचं समजतं. सचिनचा विचार होण्याचं हे एक प्रमुख कारण आहे.
