मुंबई हे चित्रपटसृष्टीचे माहेरघर आहे. शहरातील अनेक ठिकाणी चित्रपट व मालिकेचे शुटिंग होतात. गोरेगाव येथे तर मोठी चित्रनगरीच उभारली आहे. इतकंच नव्हे तर मालाडच्या मढ येथे देखील शुटिंग होत असतात. मात्र आता मुंबई व्यतिरिक्त महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक महत्त्व असलेल्या जिल्ह्यात चित्रनगरी उभारण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली आहे.
मुंबईतील गोरेगाव चित्रनगरीच्या धर्तीवर नाशिकजवळच्या इगतपुरी येथे भव्य अजित पवार चित्रनगरी साकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पार पडलेल्या बैठकीत नाशिक चित्रनगरीसाठी सांस्कृतिक कार्य विभागाला जमीन हस्तांतरित करून देण्याचे निर्देश देण्यात आले.
चित्रनगरीसाठी आर्थिक सुसाध्यता अहवाल आणि विश्लेषण करण्यासाठी केपीएमजी या तज्ज्ञ सल्लागार कंपनीची नेमणूक करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. नाशिक विभाग विकास कार्यक्रम 2009 अंतर्गत नाशिक येथे चित्रपटसृष्टी निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने मान्यता दिली आहे. चित्रनगरीसाठी प्रस्तावित असलेला इगतपुरीचा परिसर नैसर्गिकदृष्ट्या अत्यंत सुंदर आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे इगतपुरीपासून मुंबईचे अंतरसुद्धा कमी झाले आहे.
नाशिक ही भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची जन्मभूमी आहे. त्यामुळे नाशिक येथे चित्रपटसृष्टी उभारणे ही फक्त सांस्कृतिक दृष्टीनेच नव्हे, तर आर्थिक, पर्यटन आणि प्रादेशिक विकासाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. नाशिककडे उपलब्ध असलेली महामार्ग, रेल्वे, विमान वाहतुकीची साधने आणि कुंभमेळ्याच्या निमित्ताने झालेली पायाभूत सुविधा या सर्व घटकांमुळे चित्रनगरीच्या निर्मितीसाठी नाशिक सर्वार्थाने अनुकूल आहे. या प्रकल्पाची तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्यता तपासण्यासाठी तज्ञ सल्लागार संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर त्यातील निष्कर्षांच्या आधारे तातडीने अद्ययावत प्रस्ताव तयार करण्यात येईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.
सन 2009 ते 2012 या कालावधीसाठी नाशिक चित्रपटसृष्टीसाठी 10 कोटी रुपये इतका नियतव्यय मंजूर केला होता. या प्रकल्पासाठी मौजे मुंढेगाव (ता. इगतपुरी) येथे प्रत्यक्ष पाहणी करून 47हेक्टर 39. आर ही शासकीय जमीन सांस्कृतिक कार्य विभागाला देण्यासाठी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल विभागाला प्रस्ताव पाठविला आहे.
