मुंबईच्या आझाद मैदानावर आज कुणबी समाजाने ओबीसी एल्गार मोर्चाचे नियोजन केले आहे. यावेळी अनेक ओबीसी बांधव एकत्र येऊन ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मोठे शक्तीप्रदर्शन करणार आहेत. मराठा समाजाला कुणबी नोंदीद्वारे ओबीसी आरक्षणात समाविष्ट करण्याच्या सरकारी धोरणाला या मोर्चातून तीव्र विरोध दर्शवण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच शेकडो कुणबी कार्यकर्ते आझाद मैदानावर दाखल झाले आहेत. त्यांच्या डोक्यावर जय कुणबी लिहिलेल्या गांधी टोप्या आणि हातात निषेधाचे फलक पाहायला मिळत आहेत. मराठा आरक्षणानंतर ओबीसी समाजाच्या या एल्गार मोर्चेमुळे आरक्षणाचा मुद्दा अधिक चिघळण्याची शक्यता आहे.
आंदोलनाची तयारी भव्य असून आझाद मैदानावर मोठे व्यासपीठ आणि मंडप उभारण्यात आले आहेत. सकाळी दहा वाजल्यानंतर ओबीसी समाजाचे नेते या व्यासपीठावरून आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन करतील. या आंदोलकांची मुख्य मागणी ही मराठा समाजाच्या कुणबी किंवा मराठा-कुणबी नोंदींद्वारे ओबीसी आरक्षणात शिरकाव करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना तीव्र विरोध दर्शवणारी आहे. मराठा आरक्षणाच्या घोषणेनंतर ओबीसी समाजाच्या अस्तित्वाची ही लढाई असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
ओबीसी आंदोलकांच्या प्रमुख मागण्या काय?
५८ लाख नोंदी रद्द करा: मराठा समाज ओबीसीत समाविष्ट होऊ नये यासाठी सरकारने शोधलेल्या ५८ लाख मराठा-कुणबी नोंदी तात्काळ रद्द कराव्यात.
शिंदे समिती बरखास्त करा: मराठा-कुणबी नोंदी तपासण्यासाठी स्थापन केलेली शिंदे समिती त्वरित बरखास्त करावी.
ओबीसी अनुशेष भरा: ओबीसी आरक्षणाची अंमलबजावणी तत्काळ करून राज्य सरकारच्या नोकऱ्यांमधील अनुशेष त्वरित भरण्यात यावा.
जात आधारित जनगणना: जात आधारित जनगणना करून जात दाखले आधार कार्डशी लिंक करावेत.
सर्वोच्च न्यायालयाचे आदेश: सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आणि दोन समित्यांच्या शिफारसी त्वरित अमलात आणाव्यात.
