पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ परदेशात पळून गेला आहे. त्याच्याबाबत आता रोजच नवनवे खुलासे होत आहेत. सध्या निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवल याला मिळालेल्या शस्त्रपरवान्याचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याच सहीनंतर सचिन घायवळ याला शस्त्र बाळगण्याचा परवाना देण्यात आला, अशी बाब समोर आली आहे. ही माहिती समोर येताच, राज्यातील विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. असे असतानाच आता योगेश कदम यांनी प्रत्यक्ष समोर येत सविस्तर माहिती दिली आहे. मी राज्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर असताना गुन्हे प्रलंबित असलेल्य किंवा गुन्हा दाखल असलेल्या एकाही व्यक्तीला शस्त्रपरवाना दिलेला नाही, असे कदम यांनी सांगितले आहे.
शस्त्रपरवान्याबाबत होत असलेल्या आरोपांनंतर योगेश कदम यांना माध्यम प्रतिनिधींनी काही प्रश्न विचारले. याच प्रश्नांचे उत्तर देताना, शस्त्रपरवाना देण्याचा निर्णय संबंधित पोलीस आयुक्तांच्या सहीने घेतला जातो. मी याची सविस्तर माहिती पत्रकार परिषद घेऊन देणार आहे. मी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही स्पष्टीकरण दिलं आहे. विरोधक मात्र टीका करत आहेत. मी या खुर्चीवर बसलेला असल्यापासून गुन्हे प्रलंबित असलेल्या किंवा गुन्हे दाखल असलेल्या एकाही व्यक्तीला शस्त्रपरवाना देण्याची माझ्याकडून शिफारस झालेली नाही, असे स्पष्टीकरण योगेश कदम यांनी दिले आहे.
तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीला पुढे आणण्याचं काम माझ्याकूडन याआधीही झालेलं नाही, यापुढेही ते होणार नाही. जे आरोप केले जात आहेत, त्याविषयीची माहिती मी कागदपत्रांसह देईल. मी पुन्हा सांगतोय की गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीला किंवा गुन्हे प्रलंबित असलेल्या एकाही व्यक्तीला शस्त्रपरवाना देण्यासाठी मी संमती दिलेली नाही, असेही योगेश कदम यांनी पुन्हा सांगितले.
पुढे बोलताना सचिन घायवळ याच्यावर एकही गुन्हा दाखल नव्हता, असेही सांगितले. जेव्हा शस्त्रपरवान्यासाठी अपील केली जाते तेव्हा ती वैयक्तिक स्वरुपाची असते. तो कोणाचा भाऊ आहे, कोणाशी संबंध आहेत हा मुद्दा नसतो. सचिन घायवळ याच्यावर 15 ते 20 वर्षांपूर्वी जे काही गुन्हे दाखल होते, त्यातून त्याची 2019 साली माननीय न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेली आहे. 2015 ते 2025 या दहा वर्षांत सचिन घायवळवर एकही गुन्हा दाखल नाही. 2019 साली सर्व जुन्या गुन्यात माननीय न्यायालयाने सचिन घायवळला निर्दोष मुक्त केलेले आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊनच मी सद्सदविवेक बुद्धीने मी निर्णय घेतलेला आहे, अशी विस्तृत माहिती यावेळी कदम यांनी दिली.
