मुंबई महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी गोड झाली आहे. मुंबई महानगर पालिकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना ३१ हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर झाले आहे. दीपावली २०२५ करता ३१ हजार सानुग्रह अनुदान जाहीर करण्याचा निर्णय महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी घोषित केला आहे. त्यामुळे महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मुंबई महानगर पालिकेच्या खालील वर्गवारीच्या कर्मचाऱ्यांना आज दीपावली – २०२५ करीता ३१ हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. यात महानगर पालिका अधिकारी आणि कर्मचारी, अनुदान प्राप्त खासगी प्राथमिक शाळा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, पालिका प्राथमिक शाळेतील तसेच अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवक, माध्यमिक शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी (अनुदानित आणि विनाअनुदानित), माध्यमिक शाळेतील शिक्षण सेवक (अनुदानित आणि विनाअनुदानित),अध्यापक विद्यालय अधिव्याख्याते आणि शिक्षकेतर कर्मचारी (अनुदानित आणि विनाअनुदानित), अध्यापक विद्यालय शिक्षण सेवक (पूर्ण वेळ) (अनुदानित आणि विनाअनुदानित) आदींचा समावेश असून यांना ३१ हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर झाले आहे.
सामाजिक आरोग्य स्वयंसेविका (CHV) यांना भाऊबीज भेट म्हणून रुपये १४,००० तर बालवाडी शिक्षिका आणि मदतनीस यांना भाऊबीज भेट म्हणून रुपये ०५,००० भेट देण्याचा निर्णय मुंबई महानगर पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी घेतला आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी महानगरपालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील (KDMC) कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर झाला आहे.. यंदा दिवाळीनिमित्त कर्मचाऱ्यांना २०,००० रुपये बोनस मिळणार आहे. सुरुवातीला शिवसेना शिंदे गटाकडून कर्मचाऱ्यांसाठी २५ हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती . मात्र आज शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांनी थेट आयुक्तांची भेट घेत बोनस संदर्भात चर्चा केली. आयुक्तांनी २० हजार रुपयांचा बोनस निश्चित केल्याची माहिती शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांनी दिली आहे. हा बोनस जाहीर झाल्याने केडीएमसीमधील कायम कर्मचारी, परिवहन कर्मचारी आणि शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा चांगलीच गोड होणार आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा बोनसच्या रकमेत वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
