राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा होणार आहे. अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेली ही निवडणूक लक्षात घेता राज्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. राजकीय नेतेमंडळी आपल्या सोईच्या पक्षात प्रवेश करत आहेत. असे असतानाच आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. मंत्री माणिकराव कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे यांनी ठाकरे यांची साथ सोडत थेट भाजपात प्रवेश केला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते भारत कोकाटे यांचा भाजपा प्रवेश पार पडला आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत कोकाटे यांनी घेतलेल्या या निर्णयाला चांगलेच महत्त्व प्राप्त झाले आहे. 2022 साली भारत कोकाटे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. आता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. या पक्षप्रेशानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भारत कोकाटे यांच्या भाजपा प्रवेशामुळे भाजपाला बळ मिळेल. मी भरत कोकाटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे भाजपात स्वागत करतो, असे रविंद्र चव्हाण म्हणाले.
भारत कोकाटे हे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांचे बंधू आहेत. गेल्या काह वर्षांपासून या दोन्ही भावांमध्ये राजकीय मतभेद आहे. भरत कोकाटे हे सोमठाणे गावाचे सरपंच राहिलेले आहेत. सिन्नर तालुक्यात त्यांची चांगली राजकीय ताकद आहे. त्यांनी नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनमध्ये महत्त्वाच्या पदावर काम केलेले आहे. आता भारत कोकाटे यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे सिन्नर तालुक्यात भाजपाची ताकद वाढण्याची शक्यता आहे. भाजाला स्थानिक स्वराज्य संस्थेत फायदा होऊ शकतो, असे सांगितले जात आहे.
काही ठिकाणी महायुती एकत्र लढणार तर काही ठिकाणी वेगवेगळी लढणार आहे, असे सांगितले जात आहे. त्यामुळे एक संभ्रम निर्माण झाला आहे. यावर बोलताना, युतीबाबतचा निर्णय महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार हेच घेतील. सध्याच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या आहेत. प्रत्येक कार्यकर्ता हा निवडणूक लढवता यावी, यासाठी काम करत असतो. निवडणुकीची आचारसंहिता दिवाळीनंतर घोषित होईल. त्यामुळे युतीबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल, असे रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.
