Diwali 2025 : देशभरात अनेक राज्यांमध्ये दिवाळी साजरी करण्याची अनोखी पद्धत

दिवाळीचा सण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दिव्यांचा हा सण कॅलेंडरनुसार कार्तिक महिन्याच्या 15 व्या दिवशी साजरा केला जातो. जो वर्षातील सर्वात गडद रात्रीचा दिवस मानला जातो. तसेच या दिवसांमध्ये वाईटावर चांगल्याचा विजय झाल्याने हा दिवस साजरा करण्यासाठी घरोघरी दिवे लावले जातात आणि दारापूढे छान रांगोळी काढतात. तर या सणाची खास गोष्ट म्हणजे हा सण भारताच्या अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. चला तर मग आजच्या लेखात आपण कोणकोणत्या राज्यांमध्ये कोणत्या पद्धतीने दिवाळीचा सण साजरा केला जातो

देशभरात वेगवेगळ्या भागामध्ये दिवाळी साजरी करण्याची ही अनोखी पद्धत
उत्तर भारत – उत्तर भारतात दिवाळीचे सर्वात लोकप्रिय महत्त्व म्हणजे भगवान राम हे अयोध्येत परतले. येथे दिवाळी पाच दिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरी केली जाते, जी धनत्रयोदशीपासून सुरू होते आणि भाऊबीजला संपते. धनत्रयोदशी भांडी किंवा सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. नरक चतुर्दशीला लोक सकाळी अंभग्य स्नान करतात आणि संध्याकाळी दिवे लावतात. त्यानंतर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी देवी आणि गणपती बाप्पाची पूजा केली जाते, घरी दिवे लावले जातात आणि फटाके फोडले जातात. दुसऱ्या दिवशी, गोवर्धन पूजा आणि भाऊबीजचा सण साजरा करतात.

पश्चिम भारत– पश्चिम भारत म्हणजेच गुजरातमध्ये दिवाळी हा व्यवसायाचे नवीन वर्ष आहे. या दिवशी लोक नवीन खाती उघडतात आणि व्यापारी समुदाय लक्ष्मीची पूजा करून त्यांचा व्यवसाय नव्याने सुरू करतात. अंगणात रांगोळी काढणे आणि त्याभोवती तेलाचे दिवे लावणे ही येथील एक विशेष परंपरा आहे.

पूर्व भारत – पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये दिवाळीच्या रात्री म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काली पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की या रात्री देवी कालीका मातेचे अवतार घेते. म्हणून लक्ष्मी पूजेसोबत देवी कालीची पूजा केली जाते. कोलकातामध्ये, कालीघाट आणि दक्षिणेश्वर काली मंदिरांमध्ये या दिवशी मोठी गर्दी होते. तर या दिवशी घरोघरी दिवे लावले जातात. परंतु या ठिकाणी धार्मिक समारंभांवर भर वेगळा दिला जातो.

दक्षिण भारत – दक्षिण भारतातील दिवाळी साजरी करण्याची पद्धत खूप वेगळी आहे. येथे दिवाळीचा मुख्य दिवस उत्तर भारतापेक्षा एक दिवस आधी साजरा केला जातो. या दिवशी लोक सकाळी लवकर उठतात आणि संपूर्ण शरीराला तेल लावून स्नान करतात. त्यानंतर नवीन कपडे घालून घरात तयार केलेले गोड पदार्थ खाऊन आणि फटाके वाजवून हा सण साजरा केला जातो. येथे नरक चतुर्दशीचे विशेष महत्त्व आहे.