परतीचा पाऊस पुन्हा महाराष्ट्राला झोडपणार, आज ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट

गेल्या 15 दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने महाराष्ट्रात दमदार पुनरागमन केलं आहे. मुंबई पुण्यासह संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. मंगळवारी (ता २४) अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढलं होतं.आज बुधवारी देखील बहुतांश भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनच्या पावसाने परतीचा प्रवास सुरु केला आहे. सध्या मान्सून पश्चिम राजस्थानपासून परतीचा प्रवास सुरू करीत असून त्यामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे.आयएमडीने आज पालघर, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर आणि पुणे जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.

याशिवाय सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, धाराशिव, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांतही जोरदार पाऊस कोसळणार असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे.दुसरीकडे मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गासह संपूर्ण कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तर कोल्हापूर, सातारा, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिला आहे. पुढील 4 दिवस संपूर्ण राज्यात अशीच स्थिती राहणार असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असा सल्लाही देण्यात आला आहे.